Rinku Singh has scored more than 50 runs 18 times in List A competition: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा युवा खेळाडू रिंकू सिंगने आयपीएल २०२३ मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याची भारतीय संघात निवड झाली. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या टीम इंडियात त्याला स्थान मिळाले आहे. दरम्यान, या २५ वर्षीय खेळाडूने सोमवारी लिस्ट-ए स्पर्धेत देवधर ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा फलंदाजी करत संघाला संकटातून बाहेर काढले. लिस्ट-ए कारकिर्दीत त्याने १८व्यांदा ५० हून अधिक धावांची इनिंग खेळली.

मध्य विभागाकडून खेळणाऱ्या रिंकूने पूर्व विभागाविरुद्ध ६३ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. ५० षटकांत २०७ धावा करून संघ बाद झाला.
रिंकू सिंग फलंदाजीला आला तेव्हा मध्य विभागाचा संघ ११८ धावांवर ४ गडी गमावून संघर्ष करत होता. रिंकूने कर्ण शर्मासोबत ५व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रिंकूने ६३ चेंडूत ५४ धावा केल्या. ज्यामध्ये दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ८६चा राहिला.

त्याला वेगवान गोलंदाज मुरा सिंगने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कर्ण शमानेही ३२ चेंडूत ३२ धावा केल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील महिन्यात आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी रिंकूची संघात निवड केली जाऊ शकते. यासह तो आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.

हेही वाचा – IND vs WI 2nd Test: ‘…म्हणून विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला नाही’; इशान किशनने केला खुलासा

प्रत्येक तिसऱ्या डावात ५० पेक्षा जास्त धावा –

यूपीच्या रिंकू सिंगनेही लिस्ट-ए क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यापूर्वी त्याने ४६ डावात एक शतक आणि १६ अर्धशतकांच्या मदतीने १७४९ धावा केल्या होत्या. १०४ धावा ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. म्हणजेच त्याने ४७ डावात १८ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने प्रत्येक तिसऱ्या डावात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रिंकूने ६३ प्रथम श्रेणी डावांमध्ये ७ शतके आणि १९ अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये त्याची नाबाद १६३ ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

आयपीएल २०२३ मध्ये, रिंकू सिंग गुजरात टायटन्सविरुद्ध २० व्या षटकात सलग ५ षटकार ठोकून प्रसिद्धीझोतात आला होता. त्याने आतापर्यंत ८९ टी-२० सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने १७६८ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १० अर्धशतके केली आहेत. ७९ धावा ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचा स्ट्राइक रेट १४१ आहे, जो टी-२० च्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. त्याने ८० षटकारही मारले आहेत.