Rishabh Pant Sets Unique Record with Twin Centuries in Test: भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने लीड्स कसोटीत पुन्हा एकदा इतिहास लिहिला आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात १३४ धावांचे शानदार शतक झळकावल्यानंतर, पंतने दुसऱ्या डावातही १०० धावांचा टप्पा गाठून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पंतने केएल राहुलसह मोठी भागीदारी रचत भारताला ३०० धावांच्या आघाडीजवळ पोहोचवलं आहे.

पंतचे हे कसोटी क्रिकेटमधील ८ वे शतक आहे. विशेष म्हणजे त्याने यापैकी ६ शतकं भारताबाहेर झळकावली आहेत. तर, इंग्लंडविरुद्ध ही त्याची ५ वी शतकी खेळी आहे. इंग्लंडमध्ये खेळताना त्याने यापैकी ४ शतकं झळकावली आहेत. पंतच्या शतकामुळे तो विदेशी भूमीवर सर्वाधिक कसोटी शतकं झळकावणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

शतक झळकावल्यानंतर पंत काही मोठे फटके खेळल्यानंतर बाद झाला. त्याने १४० चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह ११८ धावांची वादळी खेळी केली. यासह त्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एक दुर्मिळ विक्रम आपल्या नावे केला आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही डावात शतक झळकावणारा पंत फक्त जगातील दुसरा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी एका कसोटीत यष्टीरक्षक म्हणून दोन शतकं करण्याचा विक्रम अँडी फ्लॉवर यांच्या नावावर आहे. अँडी फ्लॉवर यांनी २००१ मध्ये हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ही कामगिरी केली होती. अँडी फ्लॉवर यांनी पहिल्या डावात १४२ धावा आणि दुसऱ्या डावात त्यांनी १९९ धावांची खेळी करत ही कामगिरी आपल्या नावे केली होती. ऋषभ पंतने आता अँडी फ्लॉवर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

दोन्ही डावात शतक झळकावणारा भारताचा सातवा खेळाडू

विजय हजारे
सुनील गावस्कर
राहुल द्रविड
विराट कोहली
अजिंक्य रहाणे
रोहित शर्मा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत लीड्स कसोटीत टीम इंडियाने ५ शतकं झळकावली आहेत. पंतच्या दोन शतकांव्यतिरिक्त, यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल यांनीही शतकी कामगिरी केली आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाने एका कसोटी सामन्यात ५ शतकं केली आहेत.