India vs England 1st Test: भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतने आपला दर्जा आणखी उंचावला आहे. पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने शतक झळकावलं आहे. या शतकी खेळीसह तो एकाच सामन्यात २ शतकं झळकावणारा आशियातील पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. याआधी हा कारनामा आशियातील कुठल्याही यष्टीरक्षकाला करता आलेला नाही.

या डावात ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ज्यावेळी ऋषभ फलंदाजीला आला त्यावेळी भारतीय संघाचा डाव फसला होता. भारतीय संघाला विकेट्स वाचवण्यासह धावादेखील करायच्या होत्या. कारण पहिल्या डावातील शतकवीर शुबमन गिल या डावात स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे ऋषभने आपल्या आक्रमक फटकेबाजीवर नियंत्रण ठेवलं आणि केएल राहुलला साथ दिली. मात्र, जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली, तेव्हा त्याने संधीचा फायदा घेत इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ऋषभने १३० चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.

असा रेकॉर्ड करणारा ऋषभ पंत आशियातील पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज

लीड्सच्या मैदानावर ऋषभ पंतने असं काही करून दाखवलं आहे. जे कसोटी क्रिकेटमधील १४८ वर्षांच्या इतिहासात आशियातील कुठल्याही यष्टीरक्षक फलंदाजाला जमलं नव्हतं. ऋषभ पंतने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना १७८ चेंडूंचा सामना करत १३४ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याने ११८ धावांची खेळी केली. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावात शतकं झळकावणारा आशियातील पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.

केएल राहुलसोबत महत्वपूर्ण भागीदारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्यानंतर इंग्लंडने ४६५ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाला पहिल्या डावात ६ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल ४ धावांवर माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला साई सुदर्शन ३० धावा करत माघारी परतला. कर्णधार शुबमन गिल या डावात स्वस्तात बाद झाला. त्याला अवघ्या ८ धावा करता आल्या. त्यानंतर ऋषभ पंत आणि केएल राहुलने मिळून चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत ११८ धावांवर माघारी परतला. तर केएल राहुल १२० धावांवर नाबाद आहे.