भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत १४ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे. आगामी आयपीएल २०२४ मध्ये खेळण्यासाठी ऋषभ पंत पुनरागमन करणार आहे. २०२२ मध्ये ऋषभचा भीषण कार अपघात झाला होता, त्यानंतर त्याला पुन्हा फिट होण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली. मंगळवारी, बीसीसीआयने खेळाडूंचे मेडिकल अपडेट दिले, ज्यामध्ये ऋषभ पंत फिट असल्याचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) घोषित केल्याने यंदाच्या आयपीएलमध्ये तो खेळणार आहे. “पदार्पणाच्या वेळी ज्या भावना होत्या तसंच वाटतं आहे, दडपण आहे पण उत्साहही आहे.,” असे आयपीएल २०२४ मध्ये खेळण्यासाठी फिट घोषित केल्यानंतर ऋषभ पंत म्हणाला.

भावूक होत पंत पुढे म्हणाला, “मला पुन्हा क्रिकेट खेळता येणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. मी माझ्या सर्व हितचिंतक आणि चाहत्यांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीसीसीआय आणि एनसीएमधील कर्मचारी यांचा आभारी आहे. त्यांचे प्रेम आणि पाठिंबा मला प्रचंड शक्ती देत ​​आहे.”

“मी दिल्ली कॅपिटल्स आणि आयपीएलमध्ये परतण्यास उत्सुक आहे. ही स्पर्धा मला खूप आवडते. आमचे संघ मालक आणि सहाय्यक कर्मचारी यांचे समर्थन,मार्गदर्शन आणि सहकार्य मला प्रत्येक टप्प्यावर मिळाले, ज्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. मी माझ्या डीसी कुटुंबासोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी आणि चाहत्यांसमोर पुन्हा खेळण्याची आतुरतेने वाट पाहत आहे,” असे ऋषभ पंत म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२४ येत्या २२ मार्चपासून सुरू होत आहे आणि दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या आयपीएल मोहिमेला २३ मार्चला सुरूवात करणार आहे. दिल्ली संघाचा पहिला सामना पंजाब किंग्ज संघाविरूध्द मोहाली येथे खेळवला जाणार आहे.