India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर आहे. सामन्यातील सुरुवातीचे दोन दिवस भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी गाजवले. पण तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी दमदार कमबॅक केलं. इंग्लंडचा डाव ४६५ धावांवर आटोपला. दरम्यान इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकचं शतक अवघ्या एका रनमुळे हुकलं. तो ९९ धावांवर बाद होऊन माघारी परतला. ब्रुक बाद होताच ऋषभ पंतचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

लीड्सच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत नाहीये. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांनी संधी मिळताच भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. यादरम्यान भारतीय संघाला अनेकदा संधी मिळाली. पण भारतीय खेळाडूंनी सोपे झेल सोडले. याचा फायदा इंग्लंडच्या फलंदाजांनी घेतला आणि भारतीय संघावर आघाडी घेतली.

इंग्लंडचा स्टार फलंदाज दुसऱ्या दिवशी स्वस्तात माघारी परतला होता. बुमराहच्या गोलंदाजीवर सिराजने चांगला कॅच घेतला आणि ब्रुकचा डाव आटोपला होता. पण हा नो चेंडू असल्यामुळे ब्रुकला जीवदान मिळालं. याचा फायदा घेत त्याने ९९ धावा चोपून काढल्या. जेमी स्मिथ बाद झाल्यानंतर, ख्रिस वोक्स आणि हॅरी ब्रुकने मिळून अर्धशतकी भागीदारी केली. दोघेही विकेट टाकायला तयार नव्हते. ब्रुक ९७ धावांवर फलंदाजी करत असताना ऋषभ पंतने ब्रेक घेतला आणि सामना स्लो केला. याचा भारतीय संघाला चांगलाच फायदा झाला. ९९ धावांवर फलंदाजी करत असताना हॅरी ब्रुक मोठा फटका खेळायला गेला आणि झेलबाद होऊन माघारी परतला. यावेळीही ऋषभ पंतने घेतलेला ब्रेक भारतीय संघाच्या कामी आला.

याआधीही टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये ऋषभ पंतने घेतलेला ब्रेक भारतीय संघाच्या कामी आला होता. यावेळीही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. ब्रेक घेतल्यानंतर हॅरी ब्रुक बाद होऊन माघारी परतला.

इंग्लंडचा डाव ४६५ धावांवर आटोपला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडने भारतीय संघावर आघाडी घेण्यासाठी पूर्ण जोर लावला. पण इंग्लडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना बेन डकेटने ६२ धावांची खेळी केली. तर ओली पोपने १०६ धावा चोपल्या. जो रूटने २८ आणि हॅरी ब्रुकने ९९ धावांची खेळी केली. जेमी स्मिथने ४० आणि ख्रिस वोक्सने ३८ धावांची खेळी केली. इंग्लंडचा संघ ४७१ धावांपासून अवघ्या ६ धावा दूर राहिला.