चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा किमान एकदा जिंकणाऱ्या निवडक भारतीय टेनिसपटूंपैकी एक असणाऱ्या रोहन बोपण्णाने व्यावसायिक कारकीर्दीला शनिवारी पूर्णविराम दिला.
दोन दशकांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविल्यानंतर ४५व्या वर्षी बोपण्णाने हा निर्णय घेतला. बोपण्णा आपला अखेरचा सामना कझाकस्तानच्या ॲलेक्झांडर बुब्लिकविरुद्ध पॅरिस मास्टर्स स्पर्धेत खेळला होता.
‘अ गुडबाय…बट नॉट एंड’ अशी भावना व्यक्त करत समाजमाध्यमावरून बोपण्णाने निवृत्ती जाहीर केली. तब्बल वीस वर्षे खेळत राहिल्यानंतर आता थांबण्याची वेळ आली आहे, असे म्हणत बोपण्णाने आपल्या निवृत्तीच्या संदेशात जन्मगाव कूर्गपासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला.
कूर्गसारख्या छोट्या शहरातून प्रवास सुरू करणे आव्हानात्मक होते. तडा गेलेल्या कोर्टवर स्वप्नांचा पाठलाग करणे, सर्व्हिस भक्कम करण्यासाठी लाकडाचे तुकडे तोडणे, कॉफी इस्टेटमधून धावत मेहनत करत जगातील सर्वांत मोठ्या मैदानांवर उभे राहणे हा सगळा प्रवास माझ्यासाठी अद्भुत होता, असे बोपण्णा म्हणतो.
पॅरिस ऑलिम्पिकनंतर बोपण्णाने भारतासाठी खेळणे थांबवले होते. त्यानंतर एक वर्षाच्या अंतराने त्याने व्यावसायिक टेनिसमधूनही थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी २०२३ मध्ये मोरोक्कोविरुद्धच्या लढतीनंतर बोपण्णाने डेव्हिस चषकातूनही निवृत्ती घेतली होती. बोपण्णाने टेनिसला उद्देश, शक्ती आणि विश्वास यांचा स्रोत म्हटले आहे.
कारकीर्दीत २०००च्या दशकाच्या प्रारंभी बोपण्णाने व्यावसायिक टेनिसपटू म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. पेस, भूपतीपाठोपाठ तो दुहेरीमधील भारताचा सर्वांत यशस्वी खेळाडू बनला. त्याने २०१७ मध्ये कॅनडाच्या गॅब्रिएला डाब्रोवस्कीसोबत फ्रेंच स्पर्धेत मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळविले. हे त्याचे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. त्यानंतर २०२४ मध्ये मॅथ्यू एब्डनसह ऑस्ट्रेलियन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले. त्यापूर्वी एब्डनच्याच साथीत बोपण्णाने इंडियन वेल्स स्पर्धा जिंकली होती. वयाच्या ४३व्या वर्षी एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकताना त्याने सर्वांत वयस्कर विजेता होण्याचा मान मिळविला. बोपण्णा २०२४ मध्ये दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिला. निवृत्तीनंतरही बोपण्णा टेनिसमध्ये राहणार आहे. त्याने अलीकडेच भारतात युटीआर टेनिस प्रो स्पर्धा सुरू केली आहे. अन्य अनेक उपक्रमांवरही तो काम करत आहे.
मुलीसाठी खास संदेश
आपल्या निवृत्तीच्या घोषणेत बोपण्णाने मुलगी त्रिधासाठी खास संदेश दिला. मुलीने मला कायम नवीन उद्देश आणि नवी ताकद दिली, असे बोपण्णाने या संदेशात म्हटले आहे. दयाळूपणा आणि धैर्य दाखवणे हे जिंकण्यापेक्षा कितीतरी महत्त्वाचे आहे. त्यामुळेच स्वप्नांसाठी नेहमी लढणे योग्य आहे हे पटवून देण्यासाठी मी गेल्या काही वर्षांतील प्रत्येक सामना तुझ्यासाठी खेळलो, असेही बोपण्णाने या संदेशात मुलीला उद्देशून म्हटले आहे.
