भारताच्या रोहन बोपण्णा याने जपान खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या दुहेरीत अंतिम फेरी गाठली. त्याने एडवर्ड रॉजर व्हॅसेलीन याच्या साथीत ट्रीट ह्य़ुई व डॉमिनिक इंगलोट यांच्यावर ६-४, ७-६ (८-६) अशी मात केली.
बोपण्णा व त्याचा फ्रेंच सहकारी एडवर्ड यांना शेवटपर्यंत विजयासाठी झुंजावे लागले. पहिल्या सेटमध्ये त्यांनी दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला होता. दुसऱ्या सेटमध्ये त्यांना सव्‍‌र्हिसब्रेकच्या संधीचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे दुसरा सेट ट्रायब्रेकपर्यंत रंगला. अखेर चौथ्या मानांकित बोपण्णा-व्हॅसेलिन जोडीने टायब्रेकरमध्ये विजयश्री खेचून आणली.
 बोपण्णा याने या मोसमात तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यापैकी त्याने मर्सिली येथील स्पर्धेत ब्रिटिश खेळाडू कॉलिन फ्लेमिंग याच्या साथीत अजिंक्यपद मिळविले होते तर रोम मास्टर्स स्पर्धेत त्याने महेश भूपतीच्या साथीत उपविजेतेपद पटकाविले होते.