Rohini Kalam Jiu-Jitsu Athlete Dies By Sucide: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी जिउ-जित्सू खेळाडू आणि प्रशिक्षक रोहिणी कलाम रविवारी मध्य प्रदेशातील देवास येथील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. ती ३५ वर्षांची होती. प्राथमिक तपासात तिच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

राधागंजमधील अर्जुन नगर येथील त्यांच्या घरी धाकटी बहीण रोशनीला रोहिणी कलाम तिच्या खोलीत लटकलेली आढळली. यानंतर रोहिणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

ही घटना घडली तेव्हा रोहिणी कलामची आई आणि बहीण मंदिरात गेल्या होत्या, तर तिचे वडील देखील घराबाहेर होते. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कुटुंबियांचे आरोप

रोहिणी कलाम एका खासगी शाळेत मार्शल आर्ट्स प्रशिक्षक होती. ती शनिवारीच घरी परतली होती आणि ती कसल्यातरी तणावात होती, असे रोहिणी कलामची बहीण रोशनीने पोलिसांना सांगितले आहे.

रोहिणीची बहीण रोशनीने पोलिसांना सांगितले की, “तिला तिच्या नोकरीची काळजी वाटत होती. तिच्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक तिला त्रास देत होते. ती ज्या पद्धतीने फोनवर बोलत होती, त्यावरून मला हे लक्षात आले होते.”

रोहिणीबाबत अधिक माहिती देताना तिच्या वडिलांनी एनडीटीव्हीला सांगितले की, पाच मुलांपैकी सर्वात मोठी असलेली रोहिणी सतत लग्नाच्या प्रस्तावांना विरोध करत होती. कारण तिला आयपीएस अधिकारी व्हायचे होते, त्यामुळे तिने त्यावर जास्त लक्ष केंद्रित केले होते. तिने गेल्या दोन वर्षांपासून विक्रम पुरस्कारासाठी प्रयत्न केले होते, पण त्यातही तिला यश आले नव्हते.

रोहिणीची क्रीडा कारकिर्द

रोहिणीने २००७ मध्ये तिचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू केला होता. २०१५ मध्ये तिच्या व्यावसायिक जिउ-जित्सू कारकिर्दीला सुरुवात झाली. तिने २०२२ मध्ये हांग्झोऊ येथे झालेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. याचबरोबर बर्मिंगहॅम येथे २०२२ झालेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेत निवड झालेली ती एकमेव भारतीय खेळाडू होती.

रोहिणी कलामने थायलंड ओपन ग्रँड प्रिक्स २०२२ मध्ये ४८ किलो गटात कांस्यपदक आणि अबू धाबी येथे झालेल्या ८व्या आशियाई जिउ-जित्सू चॅम्पियनशिप २०२४ मध्ये क्लासिक स्पर्धेतही कांस्यपदक मिळवले होते.