भारतीय सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर चौथ्या कसोटीत शानदार कामगिरी करताना शतक झळकावले. रोहितने मोईन अलीच्या चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले, जे परदेशी भूमीवरील कसोटीतील त्याचे पहिले शतक आहे. रोहितने षटकार मारून आपले शतक पूर्ण करताच कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियाचे इतर खेळाडू टाळ्या वाजवताना दिसले.

सोनी स्पोर्ट्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात रोहितने मोईन अलीच्या चेंडूवर षटकार लगावला आहे. यानंतर, रोहित मैदानावर त्याच्यासोबत असलेला चेतेश्वर पुजारा याच्याशी हस्तांदोलन करतो आणि त्याला मिठी मारतो. विराट कोहली व्यतिरिक्त प्रशिक्षक रवी शास्त्री देखील टाळ्या वाजवताना दिसत आहेत. प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी रोहित हवेत बॅटही फडकवतो. रोहितची पत्नी रितिकाही स्टेडियममध्ये उपस्थित होती. तीने उभी राहून टाळ्या वाजवत त्याच्या कामगिरीला दाद दिली.

हेही वाचा – ENG vs IND : शानदार, जबरदस्त, झिंदाबाद..! विदेशी भूमीवर रोहितचं पहिलं शतक; पाहा VIDEO

रोहितने रचले रेकॉर्डवर रेकॉर्ड!

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात सलामीवीर म्हणून ११,००० धावा पूर्ण केल्या आहेत. सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ११,००० धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. यात रोहितने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनचा विक्रम मोडला.

सलामीवीर म्हणून रोहितने २४६ डावांमध्ये ११,००० धावा पूर्ण केल्या. त्याने २५१ डावांमध्ये ११,००० धावा करणाऱ्या हेडनचा विक्रम मोडला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात कमी डावात ११,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने २४१ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.