ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांच्या सहभागाबद्दल भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अद्याप संभ्रम असल्याचं सांगितलं आहे. रोहित आणि इशांत सध्या बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहेत. परंतू ऑस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वी करोनाचे नियम लक्षात घेता १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यासाठी रोहित आणि इशांत शर्मा यांनी ३-४ दिवसांत ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हावं लागेल.

“रोहित वन-डे आणि टी-२० मालिका कधीच खेळणार नव्हता. त्याला दुखापतीमधून सावरण्यासाठी किती वेळ लागेल हे तपासलं जात होतं. रोहितसारख्या खेळाडूने जास्त काळ विश्रांती घेणं चांगलं नाही. जर रोहित आणि इशांतने कसोटी मालिकेत खेळायला हवं असेल तर त्यांनी पुढील ३-४ दिवसांत ऑस्ट्रेलियासाठी निघावं, नाहीतर सर्व गोष्टी कठीण होऊन बसतील.” रवी शास्त्री ABC Sports वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

रोहित शर्माला आणखी काही काळ विश्रांतीचा सल्ला देण्यात आला तर मग खरंच अडचणी वाढू शकतात. ऑस्ट्रेलियात आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन आणि त्यानंतर कसोटी मालिकेत खेळणं हे समीकरण साधणं सोपं होणार नाही. २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार असून भारतीय संघ या दौऱ्यात ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे.