ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲडलेड इथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एक व्हीडिओ व्हायरल होतो आहे.
चाळिशीकडे झुकलेल्या रोहित शर्माने ॲडलेड इथे झालेल्या दुसऱ्या वनडेत ७३ धावांची संयमी खेळी केली. रोहित आणि विराट कोहली २०२७ वनडे वर्ल्डकप खेळणार का याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ७३ धावांच्या खेळीसह रोहितने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान याच सामन्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
सामना संपल्यानंतर प्रशिक्षक गंभीर रोहित शर्माशी बोलताना दिसतात. गंभीर सांगतात, ‘रोहित सगळ्यांना वाटतंय फेअरवेलची मॅच होती. किमान एक फोटो तर शेअर कर’. दोघांमधला हा गंमतीदार संवाद चांगलाच व्हायरल होतो आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीसंदर्भात सातत्याने चर्चा सुरू आहेत. रोहित आणि विराट यांनी टेस्ट तसंच टी२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारली आहे. आता हे दोघं फक्त वनडे प्रकारात खेळतात. वनडेचा वर्ल्डकप दोन वर्षांनी होणार आहे. याकरता निवडसमितीच्या ‘स्कीम ऑफ थिंग्ज’मध्ये हे दोघं आहेत का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
निवडसमितीने तीन प्रकारांसाठी तीन कर्णधार नको या विचारातून अत्यंत यशस्वी रोहित शर्माऐवजी वनडे कर्णधारपद शुबमन गिलकडे सोपवलं आहे. रोहित संघाचा भाग असेल पण विशेषज्ञ फलंदाज म्हणून. त्यामुळे निवडसमितीने युवा खेळाडूंचा प्राधान्याने विचार होईल हे स्पष्ट केलं आहे.
ॲडलेड लढतीत शून्यावर बाद झाल्यानंतरही विराट कोहलीला चाहत्यांनी उभं राहून अभिवादन केलं. विराटने याचा स्वीकार करून धन्यवाद म्हटलं. विराटच्या या कृतीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. ही कृती म्हणजे निवृत्तीचे संकेत असल्याचं चाहत्यांना वाटलं आणि सोशल मीडियावर रिटायरमेंट हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागला.
दरम्यान माजी खेळाडू आणि बॅटिंग प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी रोहितच्या ७३ धावांच्या खेळीविषयी बोलताना सांगितलं की, रोहितच्या नावावर तीन द्विशतकं आणि असंख्य शतकं आहेत. पण या ७३ धावांच्या खेळीचं मोल प्रचंड आहे. खेळपट्टी आव्हानात्मक होती. समोर अव्वल दर्जाचे गोलंदाज होते. दोन्हीचा सामना करत धावा करणं हा मोठा संघर्ष होता. तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र पूलचा फटका खेळताना त्याची एकाग्रता भंगली. मोठी खेळी करता आली नाही याचं रोहितला शल्य आहे. पण या खेळीने त्याला खूप समाधान दिलं असेल. चांगल्या चेंडूंचा सन्मान करणं आवश्यक आणि वाईट चेंडूंवर प्रहार हे धोरण अवलंबणं आवश्यक आहे. हेच धोरण रोहितने अंगीकारलं.
