Rohit Sharma Statement after losing ODI Captaincy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करताच चाहत्यांना धक्का बसला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जोडीला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. पण भारताच्या वनडे संघाचा कर्णधार मात्र यापुढे हिटमॅन नसणार यावर संघ जाहीर होताच शिक्कामोर्तब झाला. रोहित शर्माच्या जागी वनडे संघाचं कर्णधारपद शुबमन गिलला देण्यात आलं. यानंतर पहिल्यांदाच रोहितने याबाबत वक्तव्य केलं आहे.
शुबमन गिल हा भारताचा २८ वा एकदिवसीय कर्णधार असेल. रोहित शर्माने कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आता पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. यादरम्यान रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल आणि संघाबाबत आहे. रोहित शर्मा नुकताच सीएट २०२५ च्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होता. रोहितसह या कार्यक्रमाला भारताचे इतर काही खेळाडूदेखील उपस्थित होते. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा विजेता कर्णधार म्हणून रोहितला खास पुरस्कार देण्यात आला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत काय म्हणाला रोहित शर्मा?
पुरस्कार स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “मला ऑस्ट्रेलियाचा संघ आवडतो आणि त्यांच्याविरूद्ध खेळायलाही आवडतं. तिथल्या लोकांचं क्रिकेटवर विशेष प्रेम आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही ऑस्ट्रेलियाचा दौरा करत आहोत. त्यांच्याविरूद्ध एक दोन-वर्ष नाही गेली कित्येक वर्ष आम्ही खेळत आहोत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्याच्या आम्ही जवळ आलो होता, फक्त अवघ्या काही पावलांनी चुकलो. त्या क्षणाला आम्ही सर्वांनी ठरवलं की वेगळं काहीतरी करायला हवं. नेहमीच वेगळं काहीतरी करण्याचा विचार होता. ही एक दोन खेळाडूंनी वेगळं काहीतरी करून हवा तो निकाल मिळाला नसता. सर्वांनी सारख्याच विचारसरणीने पुढे जायला हवं होतं आणि तेच सर्वांनी केलं.”
रोहित शर्माच्या या वक्तव्यामुळे आता तो संघाचा कर्णधार नसला तरी त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने जी विचारसरणी आत्मसात करत सामने खेळले होते, तशाच पद्धतीने संघ आणि तो खेळताना दिसेल हे त्याने नकळत सांगितलं आहे. रोहित शर्माचा फिटनेस आणि त्याच्या सरावाच्या व्हीडिओ आणि फोटोवर तो या दौऱ्यासाठी किती जोमाने तयारी करत आहे, याचा प्रत्यय आपल्या सर्वांना आला आहे.
येत्या १९ ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. तर दुसरा सामना २३ आणि तिसरा सामना २५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होतील.