Rohit Sharma has broken Eoin Morgan’s record: पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेशचे संघ विश्वचषक २०२३ मधील १७ व्या सामन्यात आले होते. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ५० षटकात ८ गडी गमावून २५६ धावा केल्या. २५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने षटकार ठोकून एक मोठा विश्वविक्रम केला. त्याने इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनला मागे टाकले. कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक षटकार आहेत.
रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या खेळीत पहिला षटकार मारताच, कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. रोहित शर्माने इऑन मॉर्गनचा विक्रम मोडला, ज्याच्या नावावर हा विक्रम आतापर्यंत होता. मॉर्गनने २०१९ मध्ये कर्णधार म्हणून ६० षटकार मारले होते, परंतु रोहित शर्माने ६२ षटकार मारून त्याला मागे सोडले.
या प्रकरणात एबी डिव्हिलियर्स ५९ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने २०१५ मध्ये हा पराक्रम केला होता. या यादीत ब्रेंडन मॅक्क्युलम चौथ्या तर ख्रिस गेल पाचव्या स्थानावर आहे. या सामन्यात रोहित शर्माने शुबमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. या दरम्यान रोहित शर्माचे अर्धशतक हुकले आहे. त्याने ४० चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. हसन महमूदच्या चेंडूवर तो तौहीद हृदोयकरवी झेलबाद झाला.
एका कॅलेंडर वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू –
६२ षटकार – रोहित शर्मा (२०२३)
६० षटकार – इऑन मॉर्गन (२०१९)
५९ षटकार – एबी डिव्हिलियर्स (२०१५)
५४ षटकार – ब्रेंडन मॅक्युलम (२०१४)
५३ षटकार – ख्रिस गेल (२००९)
रोहित शर्माने आशियामध्ये पूर्ण केल्या ६ हजार धावा –
आशियाई भूमीवर, रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या त्याच्या डावात ६००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या. तो ही कामगिरी करणारा भारताचा सातवा फलंदाज ठरला. याआधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एमएस धोनी, सौरव गांगुली, अझरुद्दीन, राहुल द्रविड यांनी हा पराक्रम केला आहे.
आशिया खंडात भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा –
१२६०७ धावा – सचिन तेंडुलकर
७७८४ धावा – विराट कोहली
६९२९ धावा – एमएस धोनी
६३०२ धावा – सौरव गांगुली
६२६७ धावा – एम अझरुद्दीन
६१२७ धावा – राहुल द्रविड
६००० धावा – रोहित शर्मा (वृत्त लिहिपर्यंत)