Rohit Sharma Viral Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्माला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. रोहित गेल्या ८ महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी त्याने शुक्रवारी दादरच्या शिवाजी पार्कात फलंदाजीचा सराव केला. त्याचा फलंदाजीचा सराव करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यादरम्यान त्याच्या एका चाहत्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा मुंबईकरांचा लाडका खेळाडू आहे. तो दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सराव करण्यासाठी येणार असल्याचे समजताच, क्रिकेट चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली. अनेक चाहत्यांनी त्याला भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना रोहितपर्यंत पोहोचू दिले नाही. दरम्यान, रोहित आपली किटबॅग पॅक करून निघण्याच्या तयारीत असताना, एक चिमुकला चाहता त्याला भेटण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षारक्षक त्याला पुढे जाण्यापासून वारंवार थांबवत होते. ही गोष्ट रोहितच्या लक्षात येताच तो सुरक्षारक्षकांवर ओरडला आणि त्या चिमुकल्याला भेटण्यासाठी आत येऊ द्या असे म्हणाला.
रोहित आपल्या चाहत्यांना कधीच नाराज करत नाही,हे याचं ताजं उदाहरण आहे. रोहितला भेटल्यानंतर त्याने ऑटोग्राफ घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोहितने भारताचा माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि जुना सहकारी अभिषेक शर्मासोबत मिळून फलंदाजीचा सराव केला. यावेळी केकेआरचा युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी आणि मुंबईचे स्थानिक खेळाडू देखील सरावासाठी उपस्थित होते.
रोहित शर्मासाठी ऑस्ट्रेलिया दौरा अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण रोहितला जर वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धा खेळायची असेल, तर त्याला फलंदाजीत धावा कराव्या लागणार आहे. कारण त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. रोहितनंतर युवा फलंदाज शुबमन गिलची वनडे संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रोहित दुबईत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आपला शेवटचा समना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. आता ८ महिन्यांनंतर तो पहिल्यांदाच तो वनडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.