Rohit Sharma Highlights IND vs SL: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने गुरुवारी मुंबईत श्रीलंकेविरुद्ध सामन्याला पहिल्याच चेंडूवर चौकारासह सामन्याची जोरदार सुरुवात केली होती. मात्र टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडलेल्या श्रीलंकेने दुसऱ्याच चेंडूवर भारताच्या कर्णधाराला माघारी जाण्यास भाग पडले. केवळ श्रीलंकेच्या विरुद्धच नाही तर अन्यही काही सामन्यांमध्ये रोहित शर्माने जास्त वेळ मैदानात टिकून राहायला हवे, थोडा स्वतःचा विचार करून खेळायला हवं असं यापूर्वी अनेकांनी सुचवलं होतं. यावर त्याने बुधवारी भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेदरम्यान रोखठोक उत्तर दिले आहे.

भारताचा सलामीवीर सध्याच्या विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू म्हणून उदयास आला आहे, त्याने सहा सामन्यांमध्ये ६६.३३ च्या उल्लेखनीय सरासरीने ३३४ धावा केल्या आहेत. ११९.१६ चा स्ट्राईक रेट असलेला रोहित शर्मा संघाच्या फलंदाजांमध्ये सर्वात प्रभावी ठरतो. विशेष म्हणजे, पॉवरप्ले दरम्यान त्याने संघाला बळ देण्याचं काम उत्तम केलं आहे. टीकाकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, “मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत आहे. साहजिकच, संघाची परिस्थिती लक्षात घेऊन मला खेळायचं आहे. ,मैदानात मला फक्त जाऊन बॅट फिरवायची आहे असे नाही. मला ती नीट फिरवायची आहे, चांगलं खेळायचं आहे आणि संघाला टिकवून ठेवायचं आहे, ही माझी मानसिकता आहे.”

हे ही वाचा<< सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर रोहित शर्माचं मजेशीर विधान; म्हणाला, “आम्ही खेळायला गेलो तेव्हा..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकेट्सचे कोणतेही दडपण नाही कारण..

रोहित शर्मा खेळाच्या प्रेशरविषयी म्हणाला की, “जेव्हा मी खेळायला मैदानात उतरतो तेव्हा स्कोअरबोर्ड शून्यापासून सुरू होतो. त्यामुळे एक फलंदाज म्हणून मला विचार करावा लागतो, मला खेळासाठी टोन सेट करावा लागतो. कदाचित हे माझ्याच फायद्याचं आहे कारण मी फलंदाजी सुरू करताना विकेट्सचे कोणतेही दडपण नसतं. सर्व काही 0-0 असताना जेव्हा तुम्हाला सुरुवात करायची असते तेव्हा तुम्ही थोडं आक्रमक आणि निर्भयीत राहू शकता. तुम्हाला जसे खेळायचे आहे तसे खेळता येऊ शकते.”