Sanjay Manjrekar On Rohit Sharma: भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा हा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजांचा उल्लेख केला जातो, तेव्हा रोहित शर्माच्या नावाचा आवर्जुन उल्लेख केला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या रोहितने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. पण भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना वाटतं की, रोहित शर्मा हा ऑल टाईम ग्रेट भारतीय खेळाडूंच्या यादीत फिट बसत नाही.

कसोटी क्रिकेटमधील कामगिरी पाहून रोहित हा ऑल टाईम ग्रेट भारतीय खेळाडूंच्या यादीत फिट बसत नसल्याचं संजय मांजरेकरांनी सांगितलं आहे. रोहितने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये अतिशय दमदार कामगिरी केली, पण अशीच कामगिरी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये करता आलेली नाही. पण जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली, तेव्हा त्याने पूर्ण जोर लावला. रोहितने कसोटी क्रिकेटमधील ६७ सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १८ अर्धशतकं आणि १२ शतकं झळकावली आहेत.

काय म्हणाले संजय मांजरेकर?

संजय मांजरेकर यांनी दुरदर्शनच्या द ग्रेट इंडियन क्रिकेट शो या कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “आपण सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांची चर्चा करतोय. रोहित भारताच्या ऑल टाईम ग्रेटच्या यादीत फिट बसत नाही.”

रोहितला कसोटीत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही, असं संजय मांजरेकर यांचं म्हणणं आहे. पण त्यांनी रोहितने केलेल्या मर्यादीत षटकांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. रोहितने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना नेहमी स्वत:चे विक्रम बाजूला ठेवून संघाला नेहमी पुढे ठेवलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकली.

ही स्पर्धा झाल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी त्याने कसोटी क्रिकेटला देखील रामराम करत असल्याची घोषणा केली. दरम्यान आता तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे.