Rohit Sharma Mimic Sanju Samson: भारतीय वनडे संघात मोठे बदल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी शुबमन गिलची वनडे संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कर्णधारपदावरून काढल्यानंतर रोहितने पहिल्यांदाच कुठल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित शर्माचा व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबईत मंगळवारी (७ ऑक्टोबर) सिएट अवॉर्ड शोचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. दरम्यान संजू सॅमसनने एन्ट्री मारताच रोहितने दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर सर्वात पुढच्या रांगेत बसले होते. त्यावेळी संजू सॅमसनने एन्ट्री मारली. त्यावेळी आपल्या मजेशीर स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहितने संजूच्या चालण्याची अॅक्टींग करून दाखवली.श्रेयस आणि रोहित दोघेही गप्पा मारत होते. त्यावेळी रोहितने श्रेयस संजू सॅमसन कसा चालतोय, याची नक्कल करून दाखवली.

सिएटकडून रोहितचा खास सन्मान

सिएटकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रोहित शर्माचा खास सन्मान करण्यात आला. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने जेतेपदाचा मान मिळवला होता. या जेतेपदासाठी सिएटकडून रोहितचा विशेष सन्मान करण्यात आला. यासह टी-२० क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या संजू सॅमसनची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द ईयर म्हणून निवड करण्यात आली आहे. तर भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरची सिएट जियोस्टार पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताचा फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्तीची देखील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द ईयर म्हणून निवड करण्यात आली.

भारताचा युवा स्टार खेळाडू अंगकृष रघुवंशीची इमरजिंग क्रिकेटर ऑफ द ईयर म्हणून निवड करण्यात आली. तर इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुकची टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर म्हणून निवड करण्यात आली. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या हर्ष दुबेची डॉमेस्टिक क्रिकेटर ऑफ द ईयर म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय महिला संघातील फलंदाज स्म्रिती मान्धानाची सर्वोत्कृष्ट महिला फलंदाज म्हणून निवड करण्यात आली. तर दिप्ति शर्माला सर्वोत्कृष्ट महिला गोलंदाजाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.