Rohit Sharma praised Team India’s performance despite losing the third ODI: राजकोटमध्ये खेळल्या गेलल्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतासमोर विजयासाठी ३५३ धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ ४९.४ षटकात केवळ २८६ धावांवरच मर्यादित राहिला. मात्र, या पराभवानंतरही भारतीय संघाने ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ अशी जिंकण्यात यश मिळवले. मात्र, तिसऱ्या वनडेतील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपले मत व्यक्त केले. रोहित शर्मा म्हणाला की, मी ज्या प्रकारे शॉट्स खेळू शकतो त्यामुळे मी खूप खूश आहे. गेल्या ७-८ एकदिवसीय सामन्यांमध्ये आमच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे, असेही तो म्हणाला.

राजकोटमधील पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या संघांविरुद्ध आव्हानांचा सामना केला. मला वाटते आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. आज आम्हाला विजय मिळवता आला नसला तरी आमच्या खेळाडूंनी चमकदार खेळ केला. जसप्रीत बुमराह ज्याप्रकारे गोलंदाजी करत आहे. त्यामुळे तो खूप खूश असल्याचे त्याने सांगितले. विशेषत: जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटत आहे. याशिवाय या गोलंदाजामध्ये कौशल्याची कमतरता नाही. कोणत्याही गोलंदाजाचा एखादा सामना खराब जाऊ शकतो, असेही तो म्हणाला.

जसप्रीत बुमराहबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला?

भारतीय कर्णधार म्हणाला की, जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जाणवत आहे, ते आमच्यासाठी चांगले लक्षण आहे. विश्वचषकासाठी आमच्या १५ सदस्यीय संघाबाबत आम्ही स्पष्ट आहोत, आम्ही कोणत्याही संभ्रमात नाही, असे तो म्हणाला. खरंतर, रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाचा भाग नव्हता. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने संघाची कमान सांभाळली होती. त्याचबरोबर पहिले दोन ही सामने जिंकले होते.

हेही वाचा – World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी भारतात दाखल, पाहा VIDEO

टीम इंडियाला करता आली नाही विजयाची हॅट्ट्रिक –

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मोहम्मद सिराज बाद होणारा संघाचा शेवटचा फलंदाज होता. ५० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कॅमरून ग्रीनकरवी त्याला कर्णधार पॅट कमिन्सने झेलबाद केले. सिराजने आठ चेंडूत एक धाव काढली. प्रसिद्ध कृष्णा खातेही न उघडता नाबाद राहिला.

हेही वाचा – IND vs AUS 3rd ODI: विराट कोहलीच्या बॅटमधून पुन्हा एकदा धावांचा पाऊस, मोडला रिकी पाँटिंग आणि व्हिव्ह रिचर्ड्सचा विक्रम

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सात गडी गमावून ३५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ४९.४ षटकांत २८६ धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८१ धावा केल्या. विराट कोहलीने ५६ धावांची आणि श्रेयस अय्यरने ४८ धावांची खेळी खेळली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. रवींद्र जडेजाने ३५ आणि केएल राहुलने २६ धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर सलामीला आला आणि 18 धावा करून बाद झाला.