टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्मा याच्या घरी ३० डिसेंबरला छोट्या परीचे आगमन झाले. रोहित शर्माची पत्नी रितिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. रोहितने आपली स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या रितिका सजदेहशी १३ डिसेंबर २०१५ ला लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या तीन वर्षानंतर रोहित शर्मा-रितिका आई-बाबा झाले. रितिका सजदेहची चुलत बहिण आणि सोहेल खानची पत्नी सिमा खानने इन्स्टाग्रामवर मावशी झाल्याची पोस्ट टाकली होती. त्यानंतर आज रोहित शर्माने ट्विटरवर पोस्ट करून आपल्या चिमुकलीचे नाव सांगितले आहे.

सर्कल ऑफ क्रिकेट या वेबसाईटने रोहित शर्मा वडिल झाल्याची बातमी दिली होती. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतक ठोकलेला रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून भारतात आला. त्यामुळे त्याला चौथ्या कसोटीला मुकावे लागले. पण एकदिवसीय मालिकेआधी तो पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतणार आहे.

रोहितने आपली चिमुकली आणि पत्नी रितिका हीच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. त्यात आपल्या चिमुकलीचे नावही त्याने सांगून टाकले आहे. त्याने एक छोटीशी कविता पोस्ट केली आणि आपल्या मुलीचे नाव ‘समायरा’ असं ठेवल्याचं जाहीर केलं.

रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कसोबत बाबा होण्यापूर्वी एका मुलाखतीत ‘मी त्या क्षणाची फार आतुरतेने वाट पाहत आहे. तो क्षण आमचं आयुष्य बदलणारा असेल’, असे सांगितले होते.