भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे गेल्या दोन वर्षांपासून आपल्या फॉर्मशी झुंजत आहे. कसोटी संघातील त्याच्या स्थानावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याला मुंबई कसोटीच्या प्लेइंग-११ मधून बाहेर ठेवण्यात आले होते. बीसीसीआयने यासाठी दुखापतीचे कारण दिले. पण त्याचा फॉर्म पाहता हे कारण पचवणे थोडे कठीण आहे. रहाणेसाठी आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण बीसीसीआय या महिन्याच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून रोहित शर्माच्या जागी विचार करत आहे. लवकरच त्याची घोषणाही होऊ शकते.

बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले, ”दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी लवकरच निवड बैठक होणार आहे. रोहित शर्माला संघाचा उपकर्णधार बनवण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय संघाचा दक्षिण दौरा निश्चित आहे. मात्र, वेळापत्रक बदलणार आहे. बीसीसीआयने याबाबत क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला माहिती दिली आहे.”

विराटच्या अनुपस्थितीत गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अजिंक्य रहाणेने संघाची धुरा सांभाळली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली. मात्र, बॅटने त्याची कामगिरी काही खास झाली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी होती. मात्र तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. कानपूर कसोटीतही त्याने संघाची धुरा सांभाळली होती. मात्र विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचूनही भारताला ही कसोटी जिंकता आली नाही. हा सामना अनिर्णित राहिला.

हेही वाचा – IND vs NZ : खरं की काय..! मायभूमीत पराक्रम करणाऱ्या एजाज पटेलला आपल्याकडं वळवणार मुंबई इंडियन्स?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३३ वर्षीय रहाणेने गेल्या एका वर्षात १४ कसोटीत २४.६६ च्या सरासरीने ५९२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ एक शतक झळकावले आहे. हे त्याच्या कारकिर्दीच्या ४० च्या सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. २०२१ मध्ये रहाणेने १२ कसोटी सामन्यांमध्ये २० च्या सरासरीने ४११ धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ६७ धावा आहे. कानपूर कसोटीच्या दोन्ही डावांसह त्याला केवळ ३९ धावा करता आल्या. अशा स्थितीत त्याला संघातून वगळले जाण्याचा धोका आहे.