Rohit Sharma Viral Video Ritika Sajdeh Kane Williamson: रोहित शर्मा मोठ्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे. भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, यामध्ये वनडे मालिकेत विराट-रोहित या दिग्गज खेळाडूंची जोडी खेळताना दिसेल. यादरम्यान रोहित शर्माने वजन घटवल्याने त्याच्या लूकमुळे तो चर्चेत आहे. नुकताच रोहित एका कार्यक्रमासाठी उपस्थित होता, या कार्यक्रमातील त्याचे फोटो, व्हीडिओ व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा ७ ऑक्टोबरला सीएट पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिला होता. रोहित शर्मासह या सोहळ्यासाठी श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वरूण चक्रवर्ती, सुनील गावस्कर हे भारतीय खेळाडू होते. तर केन विलियमसन, तेंबा बावुमादेखील उपस्थित होते. या सोहळ्यातील एका व्हीडिओमध्ये रोहित आणि रितिका खळखळून हसताना दिसत आहेत.

या पुरस्कार सोहळ्यात मिमिक्री आर्टिस्ट शारांग श्रृंगारपुरे यांनी काही माजी खेळाडूंची नक्कल केली. यादरम्यान त्यांनी भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी, डॅनी मॉरिसन आणि रिकी पॉन्टिंग यांची अगदी हुबेहुब नक्कल केली. धोनीची अगदी अचूक नक्कल आणि त्याचे बरोबर उच्चारले जाणारे शब्द ऐकून रोहित चकित झाला आणि यादरम्यान तो खळखळून हसताना दिसला.

रोहित शर्मा धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळला आहे, त्यामुळे धोनीचं बोलणं, सामन्यापूर्वी संघातील खेळाडूंशी चर्चा आणि त्याचे शब्द अगदी तंतोतंत रोहितला माहित आहेत. यावरूनच रोहित रितिकाकडे पाहत हसताना दिसत आहे. याशिवाय व्हीडिओमध्ये रोहितच्या बाजूला केन विलियमसनदेखील दिसत आहे. तोदेखील सर्व खेळाडूंच्या नकला ऐकून हसताना दिसतो आहे. रोहित यादरम्यान विलियमसनकडे बघून हा कमाल नक्कल करतोय असं हातवारे करतानाही दिसत आहे. रोहितचा हा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

रोहित शर्माचा या कार्यक्रमातील कमालीच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रोहित शर्मा आयपीएल २०२५ पासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. यादरम्यान रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जोरदार तयारी केली आहे. रोहित शर्माच्या फिटनेसवरून त्याला अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. पण या दौऱ्यापूर्वी रोहितने १० किलो वजन घटवत पूर्ण लूक बदलला आहे. रोहित शर्माच्या सीएटच्या पुरस्कार सोहळ्यातील लूकने आणि त्याचा फिटनेस पाहून सगळेच त्याचं कौतुक करत आहेत.