Sanjay Manjrekar Criticized Rohit Sharma: भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच सर्वांना आश्चर्यचकीत करणारा निर्णय घेतला. रोहितने इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. येत्या जून महिन्यात भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच रोहितने हा निर्णय घेतला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंच्या रोहितच्या या निर्णयाचं स्वागत करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
संजय मांजरेकरांच्या ट्विटची जोरदार चर्चा
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. यावेळी त्यांनी रोहितवर निशाणा साधला आहे. संजय मांजरेकर ट्विट करत म्हणाले, “रोहितने गेल्या १५ डावात १६४ धावा केल्या आहेत. यापैकी १० तर मायदेशात न्यूझीलंड आणि बांगलादेशविरूद्ध होत्या. यादरम्यान त्याने १०.९ च्या सरासरीने धावा केल्या. सध्याच्या फिटनेसमुळे रोहित शर्माची कसोटी सलामीची कारकीर्द संपल्यातच जमा होती. म्हणूनच…”
रोहित शर्माने ज्यावेळी आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरूवात केली त्यावेळी तो मिडल ऑर्डरला फलंदाजी करायचा. त्यानंतर त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. सलामीला फलंदाजी करताना त्याने दमदार कामगिरी केली. कसोटीत त्याने अनेक मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले. त्याने कसोटी सलामीला फलंदाजी करताना ६८ डावात ९ शतकं आणि ८ अर्धशतकांच्या साहाय्याने २६९७ धावा केल्या होत्या. मात्र, शेवटच्या काही मालिकांमध्ये त्याची बॅट शांत राहिली.
बांगलादेशविरूद्ध झालेल्या मालिकेत रोहितला १०.५ च्या सरासरीने अवघ्या ४२ धावा करता आल्या. त्यानंतर मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध खेळताना ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १५.१६ च्या सरासरीने अवघ्या ९१ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियात रोहितच्या कामगिरीत मोठी घसरण पाहायला मिळाली. रोहितला ५ डावात अवघ्या ३१ धावा करता आल्या.
रोहितच्या नेतृ्त्वात भारतीय संघाने अनेक महत्वाच्या मालिकांमध्ये विजय मिळवला. मात्र, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाच्या होत्या. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका भारतीय संघाने ३-१ ने गमावली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने प्लेइंग ११ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी रोहित निवृत्ती घेणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, रोहितने मुलाखतीत सांगितले होते की, मी अजूनही निवृत्ती घेतलेली नाही. काही आठवड्यांपूर्वी रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. आता आयपीएल सुरू असताना रोहितने निवृत्तीची घोषणा केली आहे.