Rohit Sharma Viral Video: भारतीय संघातील स्टार फलंदाज रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. आता १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत रोहित शर्मा खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्याआधी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. वनडे संघाचं कर्णधारपद गेल्यानंतर रोहित पहिल्यांदाच सिएट क्रिकेट अवॉर्ड्सच्या कार्यक्रमात दिसला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला विजय मिळवून दिल्यामुळे त्याला विशेष पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला रोहित शर्मासह, श्रेयस अय्यर, वरूण चक्रवर्ती,संजू सॅमसन, केन विलियम्सन,सुनील गावस्कर, तेम्बा बावुमा आणि ब्रायन लारासारख्या दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती.
रोहित शर्माची मन जिंकणारी कृती
तर झाले असे की, या कार्यक्रमाला रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर बाजूलाच बसले होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दमदार कामगिरी केल्यामुळे श्रेयस अय्यरचा देखील सिएटकडून सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रेयस अय्यरने मिळालेला पुरस्कार हा पायाजवळ ठेवला. हे पाहताच रोहितने तो पुरस्कार उचलला आणि टेबलवर ठेवला. रोहितची ही मन जिंकणारी कृती कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. तसेच या व्हिडीओवर, हेच खरे संस्कार आहेत, अशा प्रतिक्रिया येत आहेत.
श्रेयस अय्यरची चॅम्पियन्स ट्रॉफीत दमदार कामगिरी
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीती अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपदाचा मान मिळवला होता. या स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने ५ डावात २४३ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ अर्धशतकं झळकावली. मुख्य बाब म्हणजे, भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत होता, त्यावेळी त्याने फलंदाजीला येऊन भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढलं.