संकटमोचक डी’व्हिलियर्सची शानदार खेळी; गुजरात लायन्सवर मात

कोणतीही गोष्ट अशक्यप्राय नसते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनगटात जोर असला की ती बदलता नक्कीच येते, याचा प्रत्यय एबी डी’व्हिलियर्सने पहिल्या ‘क्वालिफायर’ सामन्यात दाखवून दिला. दहाव्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सहा फलंदाज बाद झाले होते. प्रत्येक षटकात दहा धावांची गरज होती, अशा वेळी अद्भूत फलंदाजीच्या जोरावर डी’व्हिलियर्सने संघाला विजयाची वाट दाखवली. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने गुजरातला १५८ धावांमध्ये रोखले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने बंगळुरूला चार धक्के दिले असले तरी त्यानंतर डी’व्हिलियर्सने संघाचा डाव सावरला. डी’व्हिलियर्सच्या या खेळीच्या जोरावर बंगळुरूने गुजरातवर चार विकेट्स राखून विजय मिळवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

बंगळुरूने नाणेफेक जिंकून गुजरातला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांनी ३ बाद ९ अशी दयनीय अवस्था केली. फिरकीपटू इक्बाल अब्दुल्लाने यावेळी दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद केले. तर शेन वॉटसनने कर्णधार सुरेश रैनाचा काटा काढला. त्यानंतर ड्वेन स्मिथने दिनेश कार्तिकला (२६) साथीला घेत तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले. पण ख्रिस जॉर्डनने कार्तिकला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. त्यानंतर स्मिथही जास्त काळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. स्मिथने ४१ चेंडूंत पाच चौकार आणि सहा चौकारांच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली आणि संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. त्यानंतर वॉटसन आणि जॉर्डनने भेदक मारा करत गुजरातच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे चोख काम बजावले. एकलव्य द्विवेदी (१९) आणि धवल कुलकर्णी (१०) यांनी अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके मारल्यामुळे गुजरातला १५८ धावा करता आल्या. बंगळुरूकडून वॉटसनने चार बळी मिळवले, तर जॉर्डन आणि अब्दुल्ला यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

धवलच्या अविश्वसनीय गोलंदाजीने बंगळुरूला सुरुवातीला जोरदार धक्के दिले. धवलने फॉर्मात असलेल्या विराट कोहलीला भोफळाही फोडू दिला नाही. त्यानंतर ख्रिस गेललाही त्रिफळाचीत करत बंगळुरूचे कंबरडे मोडले. गुजरातच्या अचूक गोलंदाजीने बंगळुरूची सहाव्या षटकात ५ बाद २९ अशी अवस्था केली, यामध्ये चार बळी धवलचे होते. धवलने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त १४ धावा देत चार फलंदाजांना माघारी धाडले. एका बाजूने फलंदाजांची माघारी परतण्याची घाई सुरू असतानाच डी’व्हिलियर्स मात्र शांतपणे खेळपट्टीवर उभा होता. संघाची पडझड होत असताना डी’व्हिलियर्स संयतपणे फलंदाजी करत होता. पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र डी’व्हिलियर्स कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. प्रत्येक चेंडूवर प्रहार करत त्याने उत्तुंग फटके लगावत साऱ्यांच्या नजरेचे पारणे फेडले. यावेळी डी’व्हिलियर्सला अब्दुल्लाने (नाबाद ३३) चांगली साथ दिली. डी’व्हिलियर्सने ४७ चेंडूंमध्ये प्रत्येकी पाच चौकार आणि षटकारांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची संघाला विजय मिळवून देणारी खेळी साकारली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ८.४ षटकांत ९१ धावांची अभेद्य भागीदारी रचली.

संक्षिप्त धावफलक

गुजरात लायन्स : २० षटकांत सर्व बाद १५८ (ड्वेन स्मिथ ७३; शेन वॉटसन ४/२९, ख्रिस जॉर्डन २/२६) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स : १८.२ षटकांत ६ बाद १५९ (एबी डी’व्हिलियर्स नाबाद ७९; इक्बाल अब्दुल्ला नाबाद ३३;  धवल कुलकर्णी ४/१४, रवींद्र जडेजा २/२१)

सामनावीर : एबी डी’व्हिलियर्स

एबी डी’व्हिलियर्स

धावा    ७९*

चेंडू     ४७

चौकार  ५

षटकार  ५

इक्बाल अब्दुल्ला

धावा    ३३*

चेंडू     २५

चौकार  ३

षटकार  १

शेन वॉटसन

४-०-२९-४