पंजाबवर एका धावेने मात; मुरली विजयची ८९ धावांची खेळी व्यर्थ
मुरली विजयच्या दिमाखदार खेळीनंतरही किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध अवघ्या एका धावेने पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह बंगळुरुने बाद फेरीच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकले आहे. शेवटच्या षटकांत १७ धावांची आवश्यकता असताना मार्कस स्टोनिअसने एक षटकार आणि एक चौकार लगावत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र उर्वरित चेंडूच मोठा फटका मारता न आल्याने पंजाबला विजयाच्या समीप येऊनही वंचित राहावे लागले. बंगळुरुने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना पंजाबने १७४ धावा केल्या.
मुरली विजय आणि हशीम अमला यांनी ४५ धावांची सलामी दिली. शेन वॉटसनने अमलाला बाद केले. त्याने २१ धावांची खेळी केली. वृद्धिमान साहा १५ तर डेव्हिड मिलर शून्यावर बाद झाला. सहकारी बाद होत असताना देखील विजयने झुंजार खेळी करत संघाच्या विजयासाठी प्रयत्न सुरु ठेवले. वाढत्या धावगतीच्या दडपणाखाली विजय वॉटनसच्या गोलंदाजीवर युझवेंद्र चहलकडे झेल देत बाद झाला. त्याने ५७ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकारासह ८९ धावांची खेळी केली. मार्कस स्टोनिअसने २२ चेंडूत तर फरहान बेडराडीनने ७ चेंडूत ९ धावा करत विजयासाठी आटोकाट प्रयत्न केला मात्र तो अपुराच ठरला. बंगळुरुतर्फे शेन वॉटसन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी एबी डी’व्हिलियर्सच्या अर्धशतकाच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने १७५ धावांची मजल मारली. विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी ६३ धावांची खणखणीत सलामी दिली. केसी करिअप्पाने राहुलला त्रिफळाचीत केले. त्याने २५ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. त्याच षटकात त्याने कोहलीला तंबूत परतावले. त्याने २० धावा केल्या. अक्षर पटेलने शेन वॉटसन झटपट माघारी धाडले. डी’व्हिलियर्स आणि सचिन बेबी जोडीने चौथ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. ३५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६४ धावांची खेळी करुन डी’व्हिलियर्स बाद झाला. बेबीने २९ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. पंजाबतर्फे संदीप शर्मा आणि केसी करिअप्पा यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : २० षटकांत ६ बाद १७५ (एबी डी’व्हिलियर्स ६४, लोकेश राहुल ४२, सचिन बेबी ३३; केसी करिअप्पा २/१६)विजयी विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ४ बाद १७४ (मुरली विजय ८९, मार्कस स्टोनिअस ३४; शेन वॉटसन २/२२)
सामनावीर : शेन वॉटसन