Ruturaj Gaikwad Century in Duleep Trophy 2025 Semi Final: दुलीप ट्रॉफी २०२५ मधील दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळवला जात आहे. हा सामना वेस्ट झोन वि. सेंट्रल झोन यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट झोन संघाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने शतक झळकावलं आहे. वेस्ट झोन संघाचे दोन्ही फलंदाज १५ धावांच्या आतच बाद झाले होते. त्यामुळे ऋतुराजच्या शतकाने संघाचा डाव सावरत महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती.
वेस्ट झोन संघाचे दोन फलंदाज श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल अपयशी ठरले. यशस्वी जैस्वाल ४ धावा तर श्रेयस अय्यर मैदानावर स्थिरावल्यानंतर २५ धावा करत बाद झाला. ऋतुराजने मात्र चमकदार कामगिरी करत शतक केलं.
ऋतुराज गायकवाडच्या शतकाने सावरला वेस्ट झोन संघाचा डाव
दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऋतुराज गायकवाडने शानदार स्ट्राइक रोटेट करत त्याचा डाव साकारला. गायकवाडने सावधतेने खेळत ७० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळत शतक झळकावलं. गायकवाडसह श्रेयस अय्यरही चांगली फलंदाजी करत होता, त्याने चार चौकार लगावले पण वेगवान फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो २८ चेंडूत २५ धावांवर बाद झाला. पण गायकवाडने मैदानावर कायम राहत लंचब्रेकनंतर आपलं शतक पूर्ण केलं.
१४ चौकारांसह ऋतुराजने आपलं शतक झळकावलं. तर गायकवाड २०६ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकारासह १८४ धावा करण्यात यशस्वी ठरला. त्याच्याशिवाय आर्य देसाईने ६ चौकारांसह ३९ धावांची खेळी केली. तर तनुष कोटियन ११४ चेंडूत ५ चौकारांसह ६१ धावा करत नाबाद राहिला आहे. तर कर्णधार शार्दुल ठाकूरही १५ धावा करत नाबाद आहे.
इंग्लंड दौऱ्यानंतर यशस्वी जैस्वाल देखील पहिल्यांदाच मैदानावर दिसला, पण तो फक्त ३ चेंडू खेळून माघारी परतला. डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदने जैस्वालला पायचीत करत बाद केलं. हार्विक देसाई देखील दीपक चहरचा बळी ठरला, तो एक धाव करत बाद झाला.
यानंतर, आर्य देसाईने ऋतुराजसह ८२ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे वेस्ट झोन संघाला सुरुवातीच्या धक्क्यांनंतर सावरण्यास मदत झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकेकाळी गायकवाड भारताच्या कसोटी संघात सामील होणार असल्याची चर्चा होती पण आता तो तिन्ही फॉरमॅटसाठी संघाचा भाग नाहीये. ऋतुराज गायकवाडने बुची बाबू स्पर्धेत महाराष्ट्रासाठी शानदार शतकी खेळी केली. यानंतर, दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत शतक झळकावून त्याने टीम इंडियामध्ये निवडीसाठी दावा ठोकला आहे.