India vs Nepal Match Updates : अंडर-१९ विश्वचषकात भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरुच आहे. शुक्रवारी टीम इंडियाने १३२ धावांनी मोठा विजय मिळवला. अशाप्रकारे भारतीय संघाने सुपरसिक्स फेरीत सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात कर्णधार उदय सहारनसह सचिन धसने शतक झळकावत विजयात मोलाची भूमिका निभावली. सचिन मूळचा बीडच्या दुष्काळी भागातील असून तो सध्या ब्लोमफॉन्टेनमध्ये डंका वाजवत आहे. त्याने नेपाळविरुद्ध ११६ धावांची खेळी साकारत वडीलांना त्यांच्या वाढदिवशी खास बर्थडे गिफ्ट दिले.
सचिन धसच्या बॅटवर घेण्यात आला होता आक्षेप –
सचिन धसबद्दल बोलायचे, तर काही वर्षांपूर्वी पुण्यात १९ वर्षांखालील निमंत्रित स्पर्धा खेळताना, सचिन धसच्या षटकार मारण्याच्या क्षमतेने आयोजक थक्क झाले होते. त्यांनी आपली फसवणूक तर नाही ना करत, याची खात्री करण्यासाठी बॅटचा आकार तपासला. या घटनेबद्दल इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सचिन धसचे प्रशिक्षक शेख अझर म्हणाले, “त्याची शरीरयष्टी इतकी मजबूत नव्हती आणि त्यावेळी तो इतका उंचही नव्हता. त्यामुळे त्याच्या मोठ्या षटकारांनी आयोजकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांनी त्याच्या बॅटची रुंदी तपासली. काही मिनिटांनंतर, त्यांनी दोष नसल्याचे साफ केले पण त्यांना सचिनच्या खेळीने प्रभावित केले.”
“तू फक्त संघासाठी खेळ” –
शेख अझर पुढे म्हणाले, “टूर्नामेंटपूर्वी, त्याने मला सांगितले की संघाने त्याला फिनिशरची भूमिका दिली आहे. त्यामुळे तोजास्त चेंडूचा सामना करू शकणार नाही. यानंतर मी त्याला खडसावले, ‘फिनिशरसारखा खेळ, इतका स्वार्थी होऊ नकोस. तुला खेळण्यासाठी दहा चेंडू असोत किंवा दहा षटके, तू संघाला १०० टक्के देणे आवश्यक आहे. त्यामुळे तू फक्त संघासाठी खेळ.”
हेही वाचा – IND vs ENG : यशस्वी जैस्वालने झळकावलं पहिलं द्विशतक, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय खेळाडू
सचिन तेंडुलकरच्या नावावरुन ठेवले नाव –
सचिन धसचे वडील संजय यांनी क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या नावावरुन आपल्या मुलाचे नाव ठेवले. संजय धस आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला वेळ व्यथित करत आहेत. कारण त्यांच्या मुलाने त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शतकाच्या रुपाने सर्वोत्तम गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात काम करणारे संजय धस म्हणाले, “मी आज ५१ वर्षांचा झालो. उद्या सचिनचा वाढदिवस आहे, तो १९ वर्षांचा होणार आहे. हा दिवस आणि हा क्षण आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. मुलगा आपल्या वडिलांना देऊ शकतो ही सर्वोत्तम भेट आहे. हा दुप्पट नव्हे तर तिप्पट आनंद आहे. कारण आम्ही शनिवारी त्याचा वाढदिवस साजरा करणार आहोत.”
हेही वाचा – IND vs ENG 2nd Test : भारताने पहिल्या डावात केल्या ३९६ धावा, यशस्वी जैस्वालने झळकावले द्विशतक
संजय धस पुढे म्हणाले, “त्याच्या जन्माआधीच मी ठरवले होते की त्याला क्रिकेटर बनवायचे. तो केवळ साडेचार वर्षांचा असताना त्याचे प्रशिक्षण सुरू झाले. माझ्या पत्नीने सुरुवातीला या कल्पनेला विरोध केला, पण एकदा त्याने राज्यासोबत वयोगटातील क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यावर ती देखील खूश झाली.”