Sachin Tendulkar Anjali Tendulkar Viral Video: सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळात लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. तर क्रिकेटपटूंच्या घरीदेखील गणपती बाप्पा विराजमान झाल्याचे फोटो, व्हीडिओ शेअर केले आहेत. सचिन तेंडुलकरने देखील त्याच्या घरच्या गणपती पूजनाचा व्हीडिओ शेअर केला आहे. यानंतर संपूर्ण तेंडुलकर कुटुंबीय मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले होते. तेथील सचिन-अंजलीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलं सारा-अर्जुनसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले असतानाचे व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यादरम्यान सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर यांचा गोड व्हीडिओ आता व्हायरल होत आहे. प्रेम असावं तर असं, नुसतं प्रेम अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

सचिन तेंडुलकर आणि कुटुंबियांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला अर्जुनशी साखरपुडा झाल्याची चर्चा असलेली सानिया चंडोकही असेल अशी चाहत्यांमध्ये चर्चा होती. परंतु सचिनसह पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा तेंडुलकर उपस्थित होते. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा साखरपुडा झाल्याची बातमी १३ ऑगस्टला समोर आली होती. पण याबाबत दोन्ही कुटुंबानी अधिकृत माहिती दिलेली नाही.

अंजलीची ओढणी रस्त्यावर पाण्यात जाताना पाहताच सचिनने पाहा काय केलं?

संपूर्ण तेंडुलकर कुटुंबिय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. दरम्यान सारा तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर पुढे चालत होते. तर मागे सचिन तेंडुलकर आणि सचिनच्या मागे अर्जुन तेंडुलकर चालत होते. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं, तितक्यात सचिनची पत्नी अंजली चालत असताना तिची ओढणी रस्त्यावरील पाण्यात जाणार होती, तितक्यात सचिनने पाहिलं आणि खाली वाकून तिची ओढणी सावरली व तिच्या खांद्यावर दिली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन व अंजली यांच्या लग्नाला आता ३० वर्ष झाली आहेत. सचिन व अंजलीची लव्हस्टोरी सर्वांनाच माहित आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते आणि इथून पुढे त्यांची लव्हस्टोरी रंगत गेली. तर सचिन आणि अंजली यांच्यात ५ वर्षांचं अंतर आहे. अंजली तेंडुलकरही सचिनपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे. पण त्यांचं प्रेम, अंजलीचं कुटुंबासाठी समर्पण आणि एकमेकांना दिलेली साथ यामुळे त्यांचं नातं कायमचं भक्कम राहिलं आहे.