भारताच्या पराभवानंतर टिकेच्या केंद्रस्थानी असलेल्या डावखुरा फलंदाज युवराज सिंगची सचिन तेंडुलकरने पाठराखण केली आहे. युवराज खचला आहे, परंतु तो संपलेला नाही. २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या संघात तो असेल, अशा शब्दांत सचिनने युवीला पाठबळ दिले.
‘‘युवी, एका वाईट दिवसामुळे तुझ्या अनेक वर्षांच्या बहुमोल योगदानाच्या सुखद आठवणी मातीमोल ठरत नाही. तू आज खचला असशील, परंतु तू संपल्यात जमा झालेला नाहीस,’’ असे सचिनने आपल्या ‘फेसबुक’वर म्हटले आहे.
‘‘२०१५मध्ये भारतीय संघाच्या विश्वचषक पुन्हा जिंकण्याच्या अभियानात युवराज महत्त्वाची भूमिका बजावेल,’’ असे मत सचिनने व्यक्त केले. तो पुढे म्हणाला, ‘‘रविवारची संध्याकाळ युवराजसाठी खडतर होती. याबाबत त्याच्यावर टिका होऊ शकते. परंतु या कारणास्तव त्याला दूर लोटणे योग्य ठरणार नाही.’’
कर्करोगावर मात करून पुन्हा मैदानावर परतणाऱ्या युवराजबाबत सचिन म्हणाला, ‘‘मी युवराजच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा आदर राखतो. त्याने मैदानावरील आणि मैदानाबाहेरील अनेक आव्हानांवर मात केली आहे. युवराजचा दृढ निश्चय आणि लढण्याची क्षमता मला माहीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तो टिकाकारांना चुकीचे ठरवेल.’’