India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. लॉर्ड्स कसोटी जिंकून इंग्लंडने या मालिकेत आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मँचेस्टरच्या मैदानावर रंगणार आहे. भारताला गेल्या सामन्यात १९३ धावांचा पाठलाग करता आला नव्हता. आता चौथा कसोटी सामना जिंकायचा असेल तर, भारतीय संघाला धावांचा डोंगर उभारावा लागेल. त्यासाठी मँचेस्टरच्या मैदानावर भारतीय फलंदाजांना इतिहास घडवावा लागणार आहे.
ओल्ड ट्रॅफर्डचं मैदान हे भारतीय फलंदाजांसाठी आतापर्यंत अनलकी ठरलं आहे. कारण सचिन तेंडुलकरनंतर या मैदानावर कुठल्याही भारतीय फलंदाजाला शतक झळकावता आलेलं नाही. सचिनने हा कारनामा १९९० मध्ये केला होता. त्यावेळी तो अवघ्या १७ वर्षांचा होता. त्यानंतर ३५ वर्ष उलटली आहेत. पण कुठल्याही भारतीय फलंदाजाला या मैदानावर शतक झळकावता आलेलं नाही. सचिनने या मैदानावर फलंदाजी करताना ११९ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारतीय संघाला सामना ड्रॉ करण्यात यश आलं होतं.
यंदा हा रेकॉर्ड तुटणार?
हा रेकॉर्ड यावेळी तुटण्याची शक्यता आहे. कारण भारतीय फलंदाज सध्या दमदार फॉर्ममध्ये आहेत. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी शतकं झळकावली आहेत. कर्णधार शुबमन गिलने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये शतकं झळकावली होती. तर ऋषभ पंत आणि केएल राहुलने देखील शतक झळकावलं आहे. सलामीला फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वालने देखील चांगली सुरूवात करून दिली आहे. त्यामुळे यावेळी ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर हा रेकॉर्ड मोडला जाऊ शकतो.
भारतीय संघ १-२ ने पिछाडीवर
या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात धावांचा बचाव करताना भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसरा सामना एजबस्टनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत मोठा विजय मिळवला. मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १७० धावांवर आटोपला. यासह हा सामना भारतीय संघाने २२ धावांनी गमावला. सध्या इंग्लंडचा संघ या मालिकेत २- १ ने आघाडीवर आहे.