ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वॉर्नने १९४ सामन्यांत २९३ बळी घेतले आहेत. त्याने प्रथम श्रेणीत १३१९ विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज होता. वॉर्नच्या निधनानंतर भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरनेही त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विट करत भारतात शेन वॉर्नसाठी नेहमीच खास स्थान होते, असे म्हटले आहे. “स्तब्ध वॉर्नी, तुझी आठवण येईल. तुझ्यासोबत मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही कंटाळवाणा क्षण आला नाही. मैदानावरील आपले शत्रुत्व आणि बाहेरचे विनोद नेहमी लक्षात राहील. तुझ्या मनात भारतासाठी आणि भारतीयांच्या मनात तुझ्यासाठी विशेष स्थान होते,” असे सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

वॉर्नने आपल्या मुलाखतीत अनेकवेळा हे देखील नमूद केले होते की, सचिन स्वप्नात त्याच्या डोक्यावर षटकार मारताना दिसतो. १३ सप्टेंबर १९६९ रोजी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे जन्मलेल्या शेन वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ७०० बळी घेणारा वॉर्न हा एकमेव ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे.

शेन वॉर्नच्या निधनावर अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. भारताच्या अनिल कुंबळे, वसीम जाफर आणि हरभजन सिंग यांनी वॉर्नच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने, “यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. संपूर्णपणे धक्का बसला, एक महान आणि जगातील महान खेळाडूंपैकी एक, तू खूप लवकर निघून गेलास. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांबद्दल शोक व्यक्त करतो,” असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर हरभजन सिंगने, शेन वॉर्न या जगात नाही यावर विश्वास बसत नाही. माझ्या हिरो देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. मला यावर विश्वास ठेवायचा नाही. मी पूर्णपणे विस्कळीत झालो आहे, असे म्हटले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही शेन वॉर्नच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, “महान फिरकीपटू शेन वॉर्नच्या निधनाने मला धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे. त्याचे कुटुंब, मित्र आणि प्रियजनांप्रती मी शोक व्यक्त करतो,” असे म्हटले आहे.