Sachin Tendulkar Statue At Wankhede: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषक सामन्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी क्रिकेटचा महान दिग्गज सचिन तेंडुलकरच्या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. यंदा एप्रिलमध्ये ५० वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) वानखेडे स्टेडियमवर तेंडुलकरचा पुतळा बसवणार असल्याचे सांगितले होते. स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरच्या स्टँडला लागूनच स्ट्रोक खेळतानाच्या पोजमध्ये दाखवणारा हा पुतळा आहे. या अनावरण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वतः सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे सचिव जय शहा, खजिनदार आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अधिकारी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.

अहमदनगर येथील चित्रकार-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी सचिन तेंडुलकरचा पुतळा साकारला आहे. प्रमोद कांबळे यांनी हे काम सुरु करताना सांगितले की, ‘वानखेडे स्टेडियममध्ये पुतळा बसवणार असल्याचे एमसीएने सांगितले होते. त्याची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्यावर काम करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतर मी सचिन तेंडुलकरशी संपर्क साधून त्याची भेट घेतली.’

कांबळे पुढे म्हणाले, ‘यावर आम्ही सविस्तर चर्चा केली. मी त्याला विचारले की पुतळा कसा बनवायचा. यानंतर आम्ही पोझ फायनल केली, ज्यामध्ये तो षटकार मारताना दिसत आहे. आम्ही प्रथम एक लहान मॉडेल बनवले. त्यानंतर आता १४ फूट उंच पुतळा बनवला आहे. जगाचा नकाशा आणि क्रिकेट बॉलचे ग्राफिक्स असलेला एक ग्लोब तयार केला आहे आणि त्याच्या वर सचिन तेंडुलकरचे प्रतीकात्मक चित्रण केले आहे. आम्ही एक पॅनेल देखील सेट करत आहोत, जे त्याच्या कारकिर्दीबद्दल माहिती देईल.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उल्लेखनीय बाब म्हणजे, वानखेडे स्टेडियमवर तेंडुलकरने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील खेळलेल्या शेवटच्या सामन्यानंतर दहा वर्षांनी आता हा मोठा सन्मानाचा तुरा त्याच्या शिरपेचात रोवला जाणार आहे.