न्यूझीलंड संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दौऱ्यातील दुसरा व्हाईटवॉश दिला. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी यजमान न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं आव्हान ७ गडी राखत पूर्ण केलं. यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला. या पराभवानंतर नेटिझन्स भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर प्रचंड भडकल्याचे दिसून आले. रवी शास्त्री यांना पदावरून हाकलून द्या अशी मागणी नेटिझन्सने केली. रवी शास्त्री यांना बडतर्फ करा, त्यांच्या जागी भारताला एखादा तंदुरूस्त प्रशिक्षक गरजेचा आहे असे शास्त्रींवर टीका करणारे ट्विटही मोठ्या प्रमाणात करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराटने सांगितलं पराभवामागचं खरं कारण, म्हणाला…

लाजिरवाण्या पराभवानंतरही टीम इंडियासाठी ‘गुड न्यूज’

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांचा पहिला डाव काहीसा बरोबरीत सुटल्यानंतर भारताचा दुसरा डाव न्यूझीलंडने १२४ धावांत गुंडाळला. दुसऱ्या दिवशी ६ गड्यांच्या मोबदल्यात ९० धावांपर्यंत मजल मारलेल्या भारतीय संघाची तिसऱ्या दिवशीही खराब सुरुवात झाली. हनुमा विहारी टीम साऊदीच्या गोलंदाजीवर वॉटलिंगकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर ऋषभ पंत, मोहम्मद शमी हे फलंदाजही एकामागोमाग एक माघारी परतले. रविंद्र जाडेजाने फटकेबाजी करत भारताला शतकी आघाडी मिळवून दिली. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जसप्रीत बुमराह धावबाद झाला आणि भारताचा दुसरा डाव १२४ धावांमध्ये आटोपला. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात ट्रेंट बोल्टने ४, टीम साऊदीने ३ तर डी-ग्रँडहोम आणि वँगर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Video : भर पत्रकार परिषदेत विराटचा रूद्रावतार, म्हणाला…

न्यूझीलंडला विजयासाठी मिळालेल्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने एकही गडी न गमावता ४६ धावांपर्यंत मजल मारली. उपहाराच्या सत्रानंतरही खेळपट्टीवर जम बसवलेल्या लॅथम आणि ब्लंडल जोडीने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत धावफलक हलता ठेवला. यादरम्यान लॅथमने आपलं अर्धशतक साजरं केलं. अखेरीस संघाच्या १०३ धावांवर उमेश यादवने लॅथमला यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केलं. लॅथमने ५२ धावा केल्या. यानंतर जसप्रीत बुमराहने बाऊंसर चेंडू टाकत कर्णधार विल्यमसनला आपल्या जाळ्यात अडकवलं. यानंतर टॉम ब्लंडलने आपलं अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं. मात्र ५५ धावांवर खेळत असताना जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर अनुभवी रॉस टेलर आणि हेन्री निकल्स यांनी न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sack lazy ravi shastri indian fans get angry after team india loss against new zealand in test vjb
First published on: 02-03-2020 at 10:52 IST