सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि किदम्बी श्रीकांत या त्रिकुटाने चीन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या लढती जिंकत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
जागतिक क्रमवारीत पाचव्या तर या स्पर्धेसाठी सहाव्या मानांकित सायनाने चीनच्या क्वीन जिनपिंगवर २१-१८, २१-१८ अशी मात केली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत दाखल झालेल्या जिनपिंगने सायनाला प्रत्येक गुणासाठी तंगवले. मात्र आपला सारा अनुभव पणाला लावत सायनाने सरशी साधली. पुढच्या लढतीत सायनाची लढत चीनच्याच डि स्युओशी होणार आहे.
राष्ट्रकुल सुवर्णपदकविजेत्या पारुपल्ली कश्यपने एका गेमची पिछाडी भरुन काढत विजय साकारला. त्याने चीनच्या झेऊ साँगला ११-२१, २१-११, २१-१३ असे नमवले. कश्यपची पुढची लढत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या चेन लाँग आणि मार्क झ्वाइबलर यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
किदम्बी श्रीकांतने चीनच्या ह्य़ुआन गाओवर २१-१७, १९-२१, २१-१४ असा विजय मिळवला. श्रीकांतने पहिला गेम जिंकत आश्वासक सुरुवात केली. दुसऱ्या गेममध्ये अटीतटीच्या मुकाबल्यात गाओने बाजी मारली. श्रीकांतने तडाखेबंद स्मॅशेसच्या आधारे तिसऱ्या आणि निर्णायक गेमसह सामना जिंकला. पुढच्या लढतीत श्रीकांतचा मुकाबला झेनमिंग वांग आणि केंटो मोमोटाशी यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.