विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सायना नेहवालने दमदार विजयासह इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. या स्पर्धेतील एकेरी प्रकारातील भारताची एकमेव प्रतिनिधी सायनाने विजयासह आव्हान कायम राखले आहे. दुहेरी प्रकारात मात्र ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा या अनुभवी जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले.
आठव्या मानांकित सायनाने केवळ ३६ मिनिटांत स्कॉटलंडच्या कस्र्टी गिलमूरवर २१-१७, २१-९ असा विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानी असलेल्या कस्र्टीविरुद्धच्या तिन्ही लढतीत सायनाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. पहिल्या गेममध्ये प्रत्येक गुणासाठी दोघींमध्ये टक्कर पाहायला मिळाली. सायनाने १३-११ अशी भक्कम आघाडी घेतली. यानंतर कस्र्टीने झुंजार खेळ करत बरोबरी केली. मात्र यानंतर सायनाने सातत्याने गुण मिळवत पहिला गेम जिंकला.
सायनाने स्मॅशच्या फटक्यांचा प्रभावी उपयोग केला. दुसऱ्या गेममध्ये सायनाने १२-२ अशी दमदार आघाडी घेतली होती. ही आघाडी सहजपणे वाढवत सायनाने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला. दुहेरी प्रकारात कोरियाच्या ये ना जंग आणि सो यंग किम जोडीने ज्वाला-अश्विनी जोडीवर २१-१६, १५-२१, २१-१२ अशी मात केली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2014 रोजी प्रकाशित
सायनाची आगेकूच ज्वाला-अश्विनी जोडीचे आव्हान संपुष्टात
विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सायना नेहवालने दमदार विजयासह इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
First published on: 20-06-2014 at 05:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal advances to indonesia open quarters