वर्षांतील पहिलेवहिले विजेतेपद भारताची फुलराणी सायना नेहवालसाठी दिवास्वप्नच राहण्याची शक्यता आहे. हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत सायना नेहवालला पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुषांमध्ये भारताचा एकमेव प्रतिनिधी उरलेला अजय जयरामही पराभूत झाल्याने स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
थायलंडच्या पॉर्नटिप बुरानप्रार्स्टुस्कने सातव्या मानांकित सायनावर २१-१७, ९-२१, २१-१५ अशी मात केली. पॉर्नटिपविरुद्ध सायनाची कामगिरी ६-० अशी होती, मात्र गुरुवारी झालेल्या लढतीत पॉर्नटिपने सायनाला निष्प्रभ केले. पहिल्या गेममध्ये सायनाने ७-४ अशी आघाडी घेतली. मात्र पॉर्नटिपने १०-१० अशी बरोबरी केली. यानंतर पॉर्नटिपने सलग पाच गुणांची कमाई करत आगेकूच केली. दुसऱ्या गेममध्ये ४-४ अशी गुणस्थिती होती. यानंतर सायनाने १०-४ अशी दमदार आघाडी घेतली. ही आघाडी वाढवत सायनाने १४-६ अशी चांगली स्थिती गाठली. यानंतरही चांगला खेळ करत सायनाने दुसरा गेम जिंकला आणि बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये पॉनटिपने ३-० अशी आघाडी मिळवली. सायनाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पॉर्नटिपच्या सर्वागीण खेळापुढे सायना निष्प्रभ ठरली.
पुरुषांमध्ये इंडोनेशियाच्या सोनी ड्वाई कुनकोरोने अजय जयरामवर २१-१८, २१-१२ अशी मात केली.
तंदुरुस्ती अपयशाचे कारण -गोपीचंद
हैदराबाद : दमवणारे वेळापत्रक आणि तंदुरुस्ती या कारणांमुळे सायनाला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र कणखर प्रशिक्षणाच्या जोरावर ती पुढील वर्षी दमदार पुनरागमन करेल. यंदाच्या वर्षांचे वेळापत्रक खेळाडूंना थकवणारे आहे. यामुळे तंदुरुस्तीची पातळी अपेक्षीइतकी राखू शकत नाही. सप्टेंबपर्यंत सायनाची कामगिरी चांगली होत होती. मात्र त्यानंतर तिच्या कामगिरीत घसरण झाली आहे. या स्पर्धेनंतर तिला पुरेशी विश्रांती मिळणार आहे.