Sajid Khan epic reply to reporters PAK vs ENG Test series press conference video viral : पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज साजिद खान सध्या कसोटी क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. ३१ वर्षीय साजिदने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटीत २१.११ च्या सरासरीने १९ विकेट्स घेतल्या. साजिदने नोमान अलीसह पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अलीने दोन कसोटीत एकूण २० विकेट्स घेतल्या. पहिली कसोटी गमावल्यानंतर पाकिस्तानने पुढील दोन कसोटी जिंकून मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेनंतर साजिद खानचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत साजिद खानच्या फिरकी जादू पाहायला मिळाली. त्याने दमदार गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. इतकंच नाही तर त्याच्या आणि नोमान अलीच्या जोडीनं विरोधी संघाच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं. त्यानंतर चाहत्यांना पाकिस्तानचा तो काळ आठवला, जेव्हा वसीम अक्रम आणि वकार युनूस ही जोडी आपल्या गोलंदाजीने विरोधी संघावर दडपण निर्माण करुन त्यांना गुडघे टेकायला भाग पाडायचे.
साजिद खानचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल –
रावळपिंडीत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर साजिद खान पत्रकार परिषदेला आला, तेव्हा त्याने आपल्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. साजिद खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने त्याला विचारले की, “एक काळ असा होता जेव्हा वकार युनूस आणि वसीम अक्रम खेळायचे, आम्ही एकाला घाबरवताना आणि दुसऱ्याला विकेट घेताना पाहायचो. इथे आम्ही पाहिले की तुम्ही घाबरवत आहात आणि नोमान विकेट घेत होते. यावर तुमचे काय म्हणणे आहे?”
यावर प्रतिक्रिया देताना साजिद खान म्हणाला की, “मी तर कोणाला घाबरवले नाही. तुम्हीच म्हणताय की घाबरवतो. असे काही नाही. आता अल्लाहने मला हा लूकच असा दिला आहे. ज्यामुळे मी हसलो तरी लोक घाबरतात.” साजिदच्या या उत्तरावर त्याचा सहकारी खेळाडू नोमानसह सर्व पत्रकार हसू लागले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
स्टार फिरकीपटू साजिदने मे २०२१ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे पाकिस्तानसाठी कसोटी पदार्पण केले होते. आतापर्यंत, त्याने त्याच्या राष्ट्रीय संघासाठी १० कसोटी सामन्यांच्या १९ डावांमध्ये ४४ विकेट्स घेतल्या आहेत. साजिद नुकताच इंग्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी मालिकेतील विजयाचा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ ठरला आहे. पाकिस्तान संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिका ४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.