आंदोलक काँग्रेसच्या हातातले बाहुले बनल्याचा बबिताचा प्रत्यारोप

पीटीआय, नवी दिल्ली

भाजपनेत्या कुस्तीगीर बबिता फोगट यांनी स्वार्थी हेतूने कुस्तीगिरांचे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ऑलिम्पिकविजेती कुस्तीगिर साक्षी मलिकने रविवारी केला. त्यावर कुस्तीगीर आंदोलक काँग्रेसच्या हातातले बाहुले बनल्याचा प्रत्यारोप बबिता फोगट यांनी केला. आंदोलक कुस्तीगीर आणि भाजपचे नेते असलेले कुस्तीगीर यांच्यातील हे युद्ध आता टविटरवर भडकले आहे.

भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील आंदोलनाला रोज नवे वळण मिळत आहे. साक्षी मलिक आणि तिचा पती सत्यव्रत कादिअन यांनी ट्विटर या समाज माध्यमावर शनिवारी एक ध्वनिचित्रफित प्रसारित केली आहे. त्यात त्यांनी बबिता फोगट आणि भाजपनेते तिरथ राणा यांनी कुस्तीगिरांचा आपल्या स्वार्थासाठी वापर केल्याचा आरोप केला आहे. ‘‘बबिता आणि भाजपचे आणखी एक नेते तिरथ राणा यांनी जंतरमंतरवरील आंदोलनासाठी पोलिसांकडून लेखी परवानगी घेण्यास मदत केली होती. त्याद्वारे आंदोलनामागे काँग्रेस नाही, हे सिद्ध करण्याचा त्यांचा हेतू होता. परंतु, काही दिवसांनंतर त्यांनी आमचे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न केला,’’ असा आरोप साक्षीने या ध्वनिचित्रफितीद्वारे केला आहे. तो अर्थातच बबिता आणि राणा यांनी फेटाळला आहे आणि आंदोलक कुस्तीगीरच काँग्रेसच्या हातातले बाहुले बनल्याचा आरोप केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साक्षी मलिकने रविवारी ट्विट संदेशही प्रसारित करून शनिवारच्या ध्वनिचित्रफितीतील आपले म्हणणे पुन्हा मांडले. तीरथ राणा आणि बबिता फोगट त्यांच्या स्वार्थी हेतूंसाठी कुस्तीपटूंचा कसा वापर करण्याचा प्रयत्न करीत होते आणि जेव्हा कुस्तीपटू अडचणीत होते तेव्हा ते कसे सरकारच्या मांडीवर जाऊन बसले, याबद्दल मी टिप्पणी केली होती, असे ट्विट साक्षीने केले आहे.