ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मारवा अमरीचे मत
भारतामध्ये होणारी प्रो-कुस्ती लीग हे आमच्यासारख्या खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ आहे. या लीगमुळे कुस्ती विश्व एकत्र येत आहे, त्याचबरोबर जगभरातल्या नामवंत खेळाडूंचा खेळ आम्हाला पाहण्याचा योग येतो. ही लीग जिंकण्याचा माझा मानस आहे, पण या लीगमध्ये भारताची कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकचे कडवे आव्हान माझ्यापुढे असेल, असे मत रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेल्या टय़ुनिशियाच्या मारवा अमरीने व्यक्त केले.
[jwplayer vtVpMCjf]
साक्षीचा सामना करण्यासाठी तू काही विशेष सराव केला आहेस का, असे विचारल्यावर मारवा म्हणाली की, ‘‘साक्षी ही फार जिद्दी खेळाडू आहे. कोणत्याही क्षणी ती सामन्याचा नूर पालटवू शकते, हे ऑलिम्पिकमध्ये साऱ्यांनीच पाहिले आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध खेळताना एक सेकंदही तिला वेळ देता कामा नये. जर तिच्याविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर अधिक आक्रमक खेळ करावा लागेल. त्याचबरोबर प्रत्येक सेकंदाचा हिशेबही ठेवावा लागेल.’’
काही दिवसांमध्ये सुरू होणारी प्रो-कुस्ती लीगसाठी मारवा भारतामध्ये आली आहे. मारवा ही ऑलिम्पिकमध्ये कुस्ती खेळात पदक पटकावणारी पहिली महिला ठरली होती. याबाबत विचारल्यावर मारवा म्हणाली की, ‘‘माझ्यासह देशासाठी ही अभिमानास्पद बाब होती; पण मी पदक जिंकल्यावर आमच्या देशात महिला कुस्तीला चालना मिळायला मदत झाली आहे. आता बऱ्याच मुली कुस्तीकडे वळताना दिसत आहेत. एका ऑलिम्पिक पदकाने एवढा मोठा बदल आमच्या देशामध्ये घडला आहे; पण त्यासाठी मी फक्त निमित्तमात्र आहे.’’
ऑलिम्पिक पदक जिंकल्यावर देशात कशा प्रकारे स्वागत झाले, हे विचारल्यावर मारवा म्हणाली की, ‘‘पदक जिंकल्यावर मी देशात परतले आणि तब्बल महिनाभर या पदकविजयाचा जल्लोष सुरू होता. मला बऱ्याच ठिकाणी बोलावून सत्कार करण्यात आला, कारण देशवासीयांसाठी ही ऐतिहासिक गोष्ट होती. सरकारने खास पदक देऊन माझा विशेष सत्कार केला. सारे काही स्वप्नवत असेच माझ्यासाठी होते; पण आता या साऱ्यामधून मी बाहेर आले आहे, कारण मला फक्त ऑलिम्पिक कांस्यपदकावर समाधान मानायचे नाही. यापुढेही मला मोठी मजल मारायची आहे.
भारताची महिला कुस्तीपटू गीता फोगटच्या लग्नालाही मारवा उपस्थित राहणार आहे. याबद्दल विचारल्यावर मारवा म्हणाली की, ‘‘मला भारतातील लग्नांविषयी फार उत्सुकता आहे. मी आतापर्यंत बॉलीवूडच्या चित्रपटांमध्येच फक्त लग्न सोहळे पाहिले आहेत. त्यामुळे हा लग्न सोहळा पाहण्याची माझी फार उत्सुकता आहे. या सोहळ्यासाठी मी खास भारतीय पोशाखही बनवला आहे.’’
सोनियाची विजयी सलामी
हरिद्वार : जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती सोनिया लथार हिने महिलांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत धडाकेबाज प्रारंभ केला. तिने ५७ किलो गटात बिहारच्या सीमा कुमारी हिच्यावर सहज मात केली.
सोनिया हिने केलेल्या आक्रमक खेळापुढे सीमा हिचा बचाव निष्प्रभ ठरला. पंचांनी तांत्रिक गुणांच्या आधारे सोनियाला विजयी केले. तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही रौप्यपदक मिळविले होते.
जागतिक स्पर्धेत दोन वेळा कांस्यपदक मिळविणारी खेळाडू छोटो लौरा हिला येथे पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. लौरा या ३३ वर्षीय खेळाडूला मणिपूरच्या संध्या राणी हिने २-१ अशा फरकाने हरविले. महाविद्यालयीन जीवनात लौरा हिला एका अपघातात एका पायास कायमस्वरूपी दुखापत झाली होती. तरीही तिने बॉक्सिंगमध्ये करीअर करीत जागतिक स्तरावर कांस्यपदकांची कमाई केली होती. येथे लढत गमावल्यानंतर लौरा हिने सांगितले, पराभव झाल्यामुळे मी बिल्कुल निराश झालेली नाही. एका चांगल्या खेळाडूकडून मी पराभूत झाले याचाच मला आनंद झाला आहे. मी आता प्रशिक्षक म्हणूनच पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करणार आहे. सध्या अंबाला येथे मी ४० हून अधिक मुलींना बॉक्सिंग शिकवित आहे.
माजी आशियाई रौप्यपदक विजेती पवित्रा हिला ६४ किलो गटात पश्चिम बंगालच्या डॉली सिंग हिच्याकडून पुढे चाल मिळाली. माजी राष्ट्रीय विजेती प्रीति बेनिवाल हिने ६० किलो गटात विजयी प्रारंभ केला. तिने कर्नाटकच्या पूजाकुमारी हिचा पराभव केला.
अंकुश दहिया उप-उपांत्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली : आशियाई स्पध्रेत रौप्यपदक जिंकणाऱ्या अंकुश दहियाने रशियात सुरू असलेल्या एआयबीए युवा विश्व अजिंक्यपद स्पध्रेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अंकुशने जर्मनीच्या निक बिएरवर ३-२ असा निसटता विजय मिळवला आणि यंदाच्या स्पध्रेत अंतिम १६ मध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मानही पटकावला. अंकुश पदकनिश्चितीपासून दोन विजय दूर आहे. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात आशियाई स्पध्रेत रौप्यपदक जिंकणाऱ्या आशीषने (५४ किलो), सचिन (४९ किलो) आणि रेयाल पूरी (८१ किलो) यांच्यासह अंतिम ३२ खेळाडूंमध्ये स्थान पटकावले. मात्र, अनवर (५२ किलो) आणि इताश खान (५६ किलो) यांना दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ साली झालेल्या युवा अजिंक्यपद स्पध्रेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
[jwplayer VwmkQGEJ]