Tops 5 Costliest Players In PSL 2025: आयपीएल ही जगातील सर्वांत मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मार्च ते मेदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होत असतात. मुख्य बाब म्हणजे ही स्पर्धा सुरू असताना आंतरराष्ट्रीय मालिकाही होत नाहीत. कारण- राष्ट्रीय संघात खेळणारे खेळाडू हे आयपीएल खेळण्यात व्यग्र असतात. मात्र, पाकिस्तानच्या खेळाडूंना या स्पर्धेत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला सुरुवात केली. पीसीबीला आयपीएल स्पर्धेला मागे टाकून पुढे निघायचे आहे. मात्र, ते या स्पर्धेच्या आसपासही पोहोचू शकलेले नाहीत. आयपीएलमध्ये जितकी खेळाडूची बेस प्राईज असते, तितक्याच किमतीत विकला गेलेला खेळाडू हा पीएसएल स्पर्धेतील सर्वांत महागडा खेळाडू आहे.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा ही आयपीएल स्पर्धा सुरू होण्याआधी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सुरू होत असते. मात्र, या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे पीएसएल पुढे ढकलावी लागली. या स्पर्धेला ८ एप्रिलला सुरुवात झाली असून, स्पर्धेतील अंतिम सामना १९ मे रोजी खेळवला जाणार आहे. या वर्षी पीएसएल स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही आपले नाव नोंदवले होते. तो या वर्षी झालेल्या लिलावात सर्वांत महागडा खेळाडू ठरला.

पीएसएल स्पर्धेतील सर्वांत महागडे खेळाडू

आयपीएल स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व केलेल्या डेव्हिड वॉर्नरने आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या मेगा ऑक्शनसाठी आपले नाव नोंदवले होते. मात्र, कुठल्याही फ्रँचायजीने त्याच्यावर बोली लावण्यात रस दाखवला नाही. आयपीएलच्या लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर त्याने पीएसएल लिलावात नाव नोंदवले आणि तो या स्पर्धेतील सर्वांत महागडा खेळाडू ठरला. कराची किंग्ज संघाने त्याच्यावर ३,००,००० डॉलर्स म्हणजेच दोन कोटी ५७ लाख रुपयांची बोली लावली. तसेच त्याच्यावर संघाच्या कर्णधारपदाचीही जबाबदारी सोपवली.

पीएसएलमध्ये सर्वांत मोठी बोली लागलेल्या खेळाडूंच्या यादीत डेव्हिड वॉर्नर अव्वल स्थानी आहे आणि आयपीएल २०२५ च्या लिलावात अनसोल्ड राहिलेला डॅरिल मिशेल या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वांत महागडा खेळाडू ठरला. लाहोर कलंदर्सने त्याला एक कोटी ८८ लाखांची बोली लावून आपल्या संघात घेतलं. तर बाबर आझमवर एक कोटी ८८ लाख, फखर जमानवर एक कोटी ८८ लाख आणि शाहीन आफ्रिदीवरही एक कोटी ८८ लाखांची बोली लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.