Asia Cup 2025 Final Salman Ali Agha on Handshake Controversy IND vs PAK: आशिया चषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने सुपर फोर टप्प्यातील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. तर पाकिस्तानने श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवलं. या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यादरम्यान त्याने भारताविरूद्ध सामन्यातील हस्तांदोलन वादावर पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक २०२५ मध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवले गेले. यामध्ये दोन्ही संघांमध्ये गट टप्प्यात १४ सप्टेंबरला पहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी संघासह हस्तांदोलन करण्यास नकार दिला. नाणेफेकीदरम्यान सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी ना हस्तांदोलन केलं ना त्याच्याशी चर्चा केली. या हस्तांदोलन वादावर पाकिस्तानच्या कर्णधाराने वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तान बोर्डाने भारताने हस्तांदोलन न केल्याने आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना आशिया चषकातून काढून टाकण्याची मागणी केली होती, मागणी मान्य न केल्यास पाकिस्तानने आशिया चषकावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. पण नंतर पायक्रॉफ्ट यांच्याशी व आयसीसीशी चर्चा केल्यानंतर पाकिस्तानचा संघ युएईविरूद्ध सामना खेळण्यासाठी उतरला. भारतीय संघाने यानंतर सुपर फोर सामन्यातही पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही.
भारत-पाक फायनलपूर्वी हँडशेक वादावर काय म्हणाला पाकिस्तानचा कर्णधार?
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा १४ सप्टेंबरला झालेल्या भारत-पाक सामन्यातील हस्तांदोलन वादावर म्हणाला, “मी २००७-०८ पासून क्रिकेट खेळतोय, पण कोणत्याच संघाने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला नव्हता. इतकंच काय तर कितीही वाईट स्थिती असली तरी भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं आहे.” पाकिस्तान कर्णधाराचं फायनलपूर्वी पत्रकार परिषदेतील हे वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे.
संघाच्या फलंदाजीबाबत पाकिस्तानचा कर्णधार म्हणाला, “आम्हाला माहितीये संपूर्ण स्पर्धेत आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. पण काय माहित आमच्या फलंदाजांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी अंतिम सामन्यासाठी राखून ठेवली असेल.” भारत आणि पाकिस्तानचे संघ आशिया चषक स्पर्धेत ४१ वर्षांत पहिल्यांदाच अंतिम सामन्यात भिडणार आहेत.