औरंगाबादच्या संभाजी पाटीलचा सोनेरी प्रवास; पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक

औरंगाबादच्या १७ वर्षीय संभाजी पाटीलने अझरबैजान येथे झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पध्रेत दोन सुवर्णपदके जिंकून महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली. त्याच्या या कामगिरीवर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. लहानपणी खेळण्यासाठी पिस्तुलामुळे नेमबाजीप्रति निर्माण झालेली रुची आणि त्यावर रविवारी उमटलेली सुवर्णपदकाची मोहोर, याने पाटील कुटुंबाच्या घराचे वातावरण चैतन्यमय झाले आहे. ‘‘संभाजीच्या मेहनतीचे फळ मिळाले. लहानपणी खेळण्यासाठी त्याला डिजिटल बंदूक आणून दिली. त्या बंदुकीने अचूक वेध घेण्याचा खेळ खेळता खेळता त्याला नेमबाजीत आवड निर्माण झाली. त्याने मग सातत्यपूर्ण कामगिरी करत विविध स्पर्धामध्ये आपला ठसा उमटवला. आज त्याने पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकले आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो,’’ असे संभाजीचे वडील शिवाजी पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

औरंगाबाद येथील अग्निशमन दलात अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या शिवाजी यांनी मुलाच्या कामगिरीबद्दल त्याला मदत करणाऱ्या, पाठबळ देणाऱ्या सर्वाचे आभार मानले. ते म्हणाले, ‘‘क्रीडा क्षेत्राचा आणि आमच्या कुटुंबाचा दूरवर संबंध नाही. मात्र, संभाजीच्या निमित्ताने आम्ही या क्षेत्राच्या जवळ आलो. संभाजीने स्केटिंग आणि बुद्धिबळ स्पध्रेतही सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे त्याचे पहिले पदक हे स्केटिंगमधले आहे, पण त्याचे सर्व लक्ष नेमबाजीकडे होते आणि आम्हीही त्याला पाठिंबा दिला. सुरुवातीला येथील स्थानिक रेंजवर आणि क्रीडा संकुलात त्याने नेमबाजीचे धडे गिरवले. गेल्या पाच वर्षांपासून तो पुणे येथील बालेवाडी क्रीडासंकुलात सराव करत आहे. त्याची जिद्दच त्याला इथवर घेऊन आली आहे आणि तो याही पुढे चांगली कामगिरी करेल.’’

१३ जानेवारी १९९९ साली जन्मलेल्या संभाजीने पहिले पदक वयाच्या पाचव्या वर्षी स्केटिंगमध्ये पटकावले. त्यानंतर तो नेमबाजीकडे वळला. २०११ साली पुण्यात झालेल्या ‘गन फॉर ग्लोरी’च्या नेमबाजी अजिंक्यपद स्पध्रेत त्याने कांस्यपदक जिंकले. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत त्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील एकूण ५५ पदके

नावावर केली. घरची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यामुळे आणि इतरांकडून मिळालेल्या मदतीमुळे संभाजीला आर्थिक अडचणीमुळे कधी कोणत्या स्पध्रेला मुकावे लागले नाही.

वर्षांच्या सुरुवातीला जर्मनीत झालेल्या स्पध्रेत त्याने पहिल्यांदा सहभाग घेतला होता. ‘‘जर्मनीत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेत त्याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्या कामगिरीने तो खूप निराश झाला आणि सात दिवस तो झोपून राहिला; पण हे अपयश मागे सोडून त्याने स्वत:ला सावरले आणि आंतरराष्ट्रीय स्पध्रेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. तो खूप जिद्दी आहे. एखादी गोष्ट करायची ठरवली, की तो त्यासाठी हवी तेवढी मेहनत घ्यायला तयार असतो. जर्मनीतील अनुभवानंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्पध्रेत सुवर्ण जिंकण्याचा निर्धार केला होता आणि तो आज पूर्ण केला,’’ असे शिवाजी सांगतात.

त्याच्या जिद्दीचा किस्सा सांगताना शिवाजी म्हणाले, ‘‘२०१२-१३ साली नाशिकमध्ये सैन्यदलाची एक स्पर्धा होती. तेव्हा संभाजी तेथे गेला होता. त्याच्यापेक्षा ८-९ वर्षांनी मोठी मुलांनी सहभाग घेतला होता. त्या वेळी उपस्थित अधिकाऱ्याच्या मनात संभाजी वरिष्ठ खेळाडूंविरुद्ध चांगली कामगिरी करू शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, संभाजीने त्या खेळाडूंना कडवी टक्कर देऊन त्या अधिकाऱ्याला अवाक्  केले.’’

शिक्षण किंवा खेळ याच्यात यश मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. प्रामाणिकपणे काम केल्यावरच यश मिळते. एका यशाने आयुष्य पूर्ण होत नसते. असे किती तरी यश आयुष्यात मिळवायची असतात आणि त्यासाठी रोज संघर्ष करत राहणे, मेहनत घेत राहणे गरजेचे आहे. प्रत्येक दिवशी स्वत:शी स्पर्धा करत राहायला हवे.

– शिवाजी पाटील, संभाजीचे वडील