भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची साथीदार कारा ब्लॅक यांना २०१४ मोसमाच्या पहिल्याच स्पर्धेत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. डब्ल्यूटीए अपिया आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सानिया-कारा जोडीवर ऑस्ट्रेलियाची जार्मिला गजदोसोव्हा आणि क्रोएशियाची अल्जाट टोमलीजॅनोव्हिक यांनी ३-६, २-६ अशी मात केली. गेल्या मोसमाचा शेवट दोन जेतेपदांनी करणाऱ्या सानिया-कारा जोडीला सहापैकी फक्त एक ब्रेकपॉइंट आपल्याकडे वळवता आला. त्यांनी प्रत्येक सेटमध्ये दोन वेळा आपली सव्‍‌र्हिस गमावली. जार्मिला-अल्जाट यांनी चार वेळा बिनतोड सव्‍‌र्हिस लगावत सानिया-कारा जोडीचा प्रतिकार मोडीत काढला. प्रतिस्पध्र्यापेक्षा जार्मिला-अल्जाट जोडीने फक्त एक वेळ दुहेरी चूक केली. आता सानिया आणि कारा जोडीचे सोमवारपासून सुरू होणाऱ्या मोसमातील पहिल्यावहिल्या ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेकडे लक्ष लागले आहे.