IND vs ENG 4th Test Match: भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान मँचेस्टर येथे होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताला सामना वाचविण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. चौथ्या दिवसाअखेर कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहूलच्या चिवट फलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये दोन बाद १७४ धावा रचल्या. भारतीय संघ अजूनही १३७ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे पाचवा आणि अखेरचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. इंग्लंडने पहिल्या डावात खेळताना ६६९ धावांचा डोंगर उभा केला होता. यावेळी भारताच्या गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करता आली नाही. यावरून आता भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका केली आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत संघाची निवड करत असताना जे निर्णय घेतले गेलेत, त्यावरून संजय मांजरेकर यांनी गौतम गंभीरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तीन सामन्यात भारत १-२ ने पिछाडीवर आहे. मँचेस्टरमधील चौथा सामनाही भारत गमावण्याच्या मार्गावर आहे. जर या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील ही सलग तिसरी कसोटी मालिका भारतीय संघ गमावेल. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध ०-३ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-३ असा लाजिरवाणा पराभव संघाला स्वीकारावा लागला आहे.

संजय मांजरेकर यांनी ESPNcricinfo शी बोलताना गौतम गंभीर यांच्यावर टीका केली आहे. संघात अष्टपैलू खेळाडू निवडण्याच्या हट्टामुळे संघाचे संतुलन बिघडल्याची मांजरेकर म्हणाले.

संजय मांजरेकर म्हणाले की, गौतम गंभीरने चौथा गोलंदाजाला फारशी गोलंदाजी करण्याची संधीच दिली नाही. यासाठी त्यांनी शार्दूल ठाकूरचे उदाहरण दिले. पहिल्या दोन कसोटीत शार्दूल ठाकूरला फक्त २७ षटक टाकण्यास दिले. त्यातही त्याला पुरेशा विकेट्स मिळालेल्या नाहीत. नितीश रेड्डीनेही दुखापतग्रस्त होण्यापूर्वी केवळ २७ षटके टाकली होती.

कुलदीप यादवला का खेळवले नाही?

तसेच भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला संघात न घेतल्याबद्दलही संजय मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली. मांजरेकर म्हणाले की, संघ व्यवस्थापन पत्रकार परिषदेत सातत्याने कसोटी सामन्यात वीस बळी घेण्याबद्दल भाष्य करते. पण त्यांनी कुलदीप यादवला मालिकेत खेळवण्यास नकार दिला. न्यूझीलंडविरुद्ध कुलदीप यादवने शेवटचा सामना खेळला होता. वॉशिंग्टन सुंदरला प्राधान्य दिल्यामुळे यादव बाजूला सारला गेला.

शुबमन गिलवरी केली होती टीका

संजय मांजरेकर यांनी याआधी कर्णधार शुबमन गिललाही लक्ष्य केले होते. गिल मैदानावरचे निर्णय एकटाच घेत असून तो वरिष्ठ खेळाडूंचा विचार घेत नसल्याचा आरोप मांजरेकर यांनी केला होता. मँचेस्टरमध्ये इंग्लंडची फलंदाजी जोमात असताना गिलने वॉशिंग्टन सुंदरला खूप उशीरा चेंडू दिला. त्याने लॉर्ड्समध्ये खरंतर चांगली गोलंदाजी केली होती. पण मँचेस्टरमध्ये ६८ व्या षटकापर्यंत त्याला गोलंदाजी दिली नाही. त्यानंतर जेव्हा तो आला तेव्हा त्याने ओली पोप आणि हॅरी ब्रुक यांच्या विकेट्स मिळवल्या आणि गिलला चुकीचे ठरवले.