Sanju Samson, IPL 2026: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन हा गेल्या काही वर्षांपासून राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. सुरूवातीला त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं गेलं होतं. पण त्यानंतर त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आता आयपीएल २०२६ स्पर्धेआधी त्याने या संघाची साथ सोडण्याची तयारी केली असल्याचं म्हटलं जात आहे. आयपीएल २०२५ स्पर्धा झाल्यानंतर, त्याने या संघाची साथ सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, राजस्थान रॉयल्सकडून यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली गेली नव्हती. त्याला संघात कायम ठेवण्याचा मार्ग अजूनही मोकळा आहे. दरम्यान याबाबतचा निर्णय संघमालक आणि राहुल द्रविड मिळून घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाची मॅनेजमेंट त्याला सहज जाऊ देण्याची शक्यता खूप कमी आहे. पण त्याला जायचं असेल, तर राजस्थान रॉयल्स संघ त्याला दुसऱ्या संघासोबत ट्रेड करू शकतो किंवा मग तो लिलावात सहभागी होऊ शकतो. ट्रेड करणं म्हणजे, आपल्या संघातील एखादा खेळाडू देऊन दुसऱ्या संघातील खेळाडूला आपल्या संघात स्थान द्यायचं.
राजस्थान रॉयल्स संघाने संजू सॅमसनला गेल्या हंगामात रिटेन केलं होतं. त्याला राजस्थान रॉयल्सने १८ कोटी रूपये मोजून रिटेन केलं होतं. सॅमसनसह रियान पराग, ध्रुव जुरेल,यशस्वी जैस्वाल, शिमरोन हेटमायर आणि संदीप शर्मा यांना देखील रिटेन करण्यात आलं होतं. आगामी मेगा लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्सचा संघ संजूला आणखी २ वर्षांसाठी आपल्यासोबत कायम ठेवू शकतो. मग संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील मतभेद वाढत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जर राजस्थान रॉयल्सने त्याला रिलीज करण्यास नकार दिला, तर संजू सॅमसनकडे संघ सोडून जाण्याचा पर्याय उपलब्ध नसेल. त्यामुळे संजु सॅमसन संघाची साथ सोडून जाणार की नाही,हे आता राजस्थान रॉयल्सच्या हातात आहे.
संजू सॅमसन या संघाकडून खेळणार?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, संजू सॅमसनने जर राजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडली, तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला आपल्या संघात स्थान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयपीएल २०२५ स्पर्धा झाल्यानंतर संजू सॅमसन मेजर लीग क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात ट्रेड होऊन सॅमसन चेन्नईकडून खेळताना दिसू शकतो.
मात्र, यात एक अडथळा निर्माण झाला आहे. राजस्थानने चेन्नई सुपर किंग्ज संघातील २ खेळाडूंची अदलाबदली करण्यावर भर दिला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघासह कोलकाता नाईट रायडर्स संघ देखील ट्रेडिंगमध्ये सहभाग घेऊ शकतो. कारण या संघाला देखील भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाची गरज आहे. यासह हा संघ देखील कर्णधाराच्या शोधात आहे. आता संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समध्ये कायम राहणार की, आगामी हंगामात दुसऱ्या संघातून खेळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.