Sarah Taylor Partner Diana Pregnant: इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर सारा टेलरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती आणि तिची पार्टनर डायनासोबत दिसत आहेत. ती डायनाची प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगत आहे. यासोबतच तिने सोनोग्राफीचा फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये डायनाच्या पोटात असलेले मूल स्पष्टपणे दिसत आहे. सारा टेलरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
सारा टेलरने या दोन फोटोंसोबत लिहिले की, “आई बनणे हे माझ्या जोडीदाराचे नेहमीच स्वप्न राहिले आहे. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता, पण डायनाने हार मानली नाही. मला माहित आहे की ती सर्वोत्कृष्ट आई बनेल आणि मी त्याचा एक भाग बनून खूप आनंदी आहे. आता १९ आठवडे शिल्लक आहेत आणि त्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलेल.”
साराने या पोस्टसोबत LGBT चा इंद्रधनुष्य इमोजी देखील टाकला आहे. साराच्या या पोस्टवर क्रिकेट चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहते या जोडप्याचे आई झाल्याबद्दल अभिनंदन तर करत आहेतच, पण त्यांचा प्रवास, संघर्ष आणि जगण्याच्या पद्धतीचेही कौतुक करत आहेत. साराच्या या पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टनेही प्रतिक्रिया दिली आहे.
सारा टेलर एक दिग्गज खेळाडू आहे –
इंग्लंडची यष्टिरक्षक फलंदाज सारा टेलरने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. ती महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आणि सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. ती तीन वेळा आयसीसी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. ती इंग्लंडच्या एकदिवसीय विश्वचषक २०१७ आणि टी-२० विश्वचषक २००९ च्या विजेत्या संघाचा देखील एक भाग आहे.
टेलर ही आतंरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडची दुसरी सर्वाधिक धावा करणारा आणि एकूण सातवा खेळाडू आहे. तिने ९० सामन्यांमध्ये २९.०२ च्या सरासरीने २१७७ धावा केल्या. ज्यात १६ अर्धशतकांचा समावेश आहे. तिने १० कसोटीत ३०० धावा करताना इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.