आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीत आम्ही मिळविलेल्या ऐतिहासिक सुवर्णपदकाचे यश पाहण्यासाठी माझे आजोबा हवे होते. मी भारताला सुवर्णपदक मिळवून द्यावे हे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न मी साकार केले, मात्र ते पाहण्यासाठी माझे आजोबा हयात नाहीत याचेच दु:ख मला वाटत आहे, असे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारा सिंग म्हणाला. ‘‘माझ्या मनोधैर्यावर अनुचित परिणाम होऊ नये म्हणून माझ्या कुटुंबीयांनी माझ्या आजोबांच्या निधनाचे वृत्त माझ्यापासून लपवून ठेवले. मी घरी परतल्यानंतरच मला ते वृत्त कळले आणि मी खूप निराश झालो,’’ असे सरदारा सिंग याने सांगितले. तो पुढे म्हणाला की, ‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास चार दिवस बाकी असताना माझ्या आजोबांचे निधन झाले. उद्घाटन समारंभात ध्वज नेण्याचा मान मला मिळाल्याचे निश्चित झाल्यानंतर मी घरी कळविले होते. तेव्हाही त्यांनी मला आजोबांविषयी काहीही सांगितले नाही. कारण आजोबांचा माझ्यावर खूप जीव होता. आम्ही सतत हॉकीविषयी गप्पागोष्टी करीत होतो. मी मिळविलेले सुवर्णपदक हे त्यांनाच अर्पण करीत आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 15th Oct 2014 रोजी प्रकाशित
माझे सुवर्णपदक पाहण्यासाठी आजोबा हवे होते -सरदारासिंग
आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीत आम्ही मिळविलेल्या ऐतिहासिक सुवर्णपदकाचे यश पाहण्यासाठी माझे आजोबा हवे होते. मी भारताला सुवर्णपदक मिळवून द्यावे हे त्यांचे स्वप्न होते.

First published on: 15-10-2014 at 12:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sardar singh remember his grandfather to see historical success of the gold