युवा विश्वविजेती व विद्यमान राष्ट्रीय विजेती सरजूबाला देवी हिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत बुधवारी धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. हरयाणाच्या ममताकुमारी हिने तिच्यावर सनसनाटी विजय नोंदविला.
हरयाणाची राज्य विजेती खेळाडू व गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या ममताने सरजूबाला हिला २०-१७ असे पराभूत केले. गतवर्षी ममता हिला सरजूबालाने पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड ममताने केली. लढतीमध्ये ममताने दोन मिनिटांच्या पहिल्या फेरीत ५-४ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत तिने ५-३ अशी आघाडी मिळविली. तिसऱ्या फेरीत सरजूबाला हिने जोरदार ठोशांचा उपयोग केला, मात्र ममतानेही तितकेच प्रत्युत्तर दिले. या फेरीत ममता हिला बेशिस्त वर्तनाबद्दल ताकीद देण्यात आली. चौथ्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी आक्रमक चाली केल्या. सरजूबाला हिलाही बेशिस्त वर्तनाबद्दल पंचांनी ताकीद दिली. चुरशीने झालेली ही लढत ममताने तीन गुणांनी जिंकून खळबळजनक विजय नोंदविला.
लढतीनंतर ममताने सांगितले, हा विजय मिळविण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. गतवर्षीच्या पराभवाची परतफेड मी करू शकले, यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता लक्ष्य सुवर्णपदकाचे आहे. माझ्या कामगिरीबाबत मी खूप समाधानी आहे.
ममता हिला मिझोरामच्या रेबेका ललीनमावली हिच्याशी खेळावे लागणार आहे. रेबेका हिने आसामच्या अनिता कहार हिच्यावर सहज मात केली.
स्पर्धेतील फ्लाय वेट गटात आशियाई रौप्यपदक विजेती खेळाडू पिंकी जांगरा हिने सुरेख कौशल्य दाखवत बसंती चानू (अखिल भारतीय पोलिस दल) हिच्यावर २९-१६ अशी मात केली.
या लढतीत तिने प्रथमपासूनच आघाडी घेतली होती. तिला आता अरुणाचल प्रदेशच्या तोनियाबाला चानू हिच्याशी खेळावे लागणार आहे. तोनियाबालाने सिक्कीमच्या रोशनी सुब्बा हिच्यावर मात केली.