वेगाचे आकर्षण सर्वानाच असते. भारतात अशा वेगवीरांची कोणतीच कमतरता नाही. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता शनिवारी नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर रंगलेल्या फॉम्र्युला-वनच्या सराव शर्यतींना मिळणारा चाहत्यांचा उत्साह पाहून जणू तेच जाणवत होते. पण ‘यह तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है’.. एकमेकांना मागे टाकण्यासाठीची झुंज.. प्रतितास ३०० ते ३२५ किलोमीटरच्या वेगाने पळणाऱ्या कार.. अव्वल स्थान पटकावण्यासाठी रंगणारी चुरस.. वेळप्रसंगी होणारे अपघात.. असा फॉम्र्युला-वनचा खरा थरार रविवारी चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेलने आपला करिष्मा पुन्हा एकदा दाखवत इंडियन ग्रां. प्रि.च्या पात्रता शर्यतीवर अधिराज्य गाजवले. चाहत्यांच्या आगमनासाठी नोएडानगरीही सज्ज झाली आहे. वेगाच्या थराराच्या फराळासोबत खमंग कार्यक्रमांची लज्जतही चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
पुढील मोसमात इंडियन ग्रां. प्रि. शर्यत होणार नसल्याचे शल्य कुठेतरी भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. भारतीय चाहत्यांच्या मनावरील वेगाचे गारुड कमी झाल्यामुळे शनिवारी झालेल्या सराव शर्यतींना चाहत्यांचा म्हणावा तितका प्रतिसाद लाभू शकला नाही. पण रविवारी होणाऱ्या मुख्य शर्यतीला मोठय़ा संख्येने चाहते हजेरी लावतील, अशी आशा आहे. वेगाची आवड जपणारा आणि पहिल्या मोसमात इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीचे उद्घाटन करणारा सचिन तेंडुलकर कारकिर्दीच्या उंबरठय़ावर असल्याकारणाने तो या शर्यतीला उपस्थिती लावेल की नाही, याबाबत साशंकताच आहे.