भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली फिफाच्या अधिकाऱ्यांना अटक झाल्यामुळे फिफाला प्रायोजकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. हा रोष कमी करण्याचे प्रमुख लक्ष्य फिफाचे अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्यासमोर असणार आहे. त्या दृष्टीने सेप ब्लाटर यांनी पावले टाकली असून फिफा अधिकाऱ्यांवरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांचे त्यांनी खंडन केले.
अमेरिकेच्या आरोपपत्रात २००८साली फिफाच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण आफ्रिकेकडून १० दशलक्ष डॉलरची लाच घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये जॅक वॉर्नर यांची प्रमुख भूमिका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जगभरातील प्रायोजकांची नाराजीचा अनुभव फिफाला घ्यावा लागला. क्रेडिट कार्ड कपंनी व्हिसा यांनी फिफाला कारभारात पारदर्शकता आणण्याचा सल्ला दिला होता, तर कोका-कोला कंपनीने कठोण आणि त्वरित कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे फिफासमोरील अडचणी वाढल्या होत्या. यावर ब्लाटर म्हणाले की, ‘‘ प्रायोजकांकडून अशा प्रकारची वक्तव्ये ऐकावी लागल्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला. त्यांच्याशी संवाद साधला आणि फिफाची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यांना परत आणण्यात यश मिळेल असा विश्वास आहे.